नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ भाजपच्या नाशिक जिल्ह्यातील चार आमदारांचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात सापडले आहे. भाजपाने दोन सर्व्हे निवडणुकीच्या तोंडावर केले असून, त्यातील निर्णयाच्या आधारे तब्बल २५ आमदारांना डच्चू मिळणार असल्याने नाशिकमधील सर्वच आमदार धास्तावले आहेत. ‘जो दमदार तोच आमदार’ अशी भाजपची भूमिका असल्याने संबंधित सर्वच जण अडचणीत आले आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची मोठी लाट असतानाही भाजपला अवघ्या चार जागा मिळाल्या. त्यात एक देवळा-चांदवड मतदारसंघ, त्यानंतर नाशिक शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य या जागांचा समावेश आहे. या आमदारांचे रिपोर्ट कार्ड गेल्यावर्षीच तयार करण्यात आले होते त्यात अनेकांची कामगिरी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत गेली होती. त्यावेळीदेखील आमदारांच्या मतदारसंघात पक्षाच्या वतीने खासगी एजन्सी नेमून सर्व्हे करण्यात आला होता. त्यात कोणाची काय कामगिरी उघड झाले नसले तरी जिल्ह्यातील आमदारांनी मात्र आपला रिपोर्ट चांगलाच असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतरदेखील आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे करण्यात आला आहे.भाजपने या केलेल्या सर्व्हेनुसार आता राज्यातील २५ आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची सूत्रांनी स्पष्ट केले असून, त्यात कोण कोण आहेत याचा मात्र उलगडा उमेदवारी देतानाच होणार आहे. नाशिक शहरातील तिन्ही आमदारांची पक्षांतर्गत कारकिर्द वादग्रस्त राहिली आहे. पक्षातील राजकारण, महापालिकेतील वर्चस्वावरून वाद यामुळे वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री देखील त्रस्त झाले होते. ग्रामीण भागातील एकमेव आमदाराबाबतदेखील वेगळी स्थिती नाही. तेथे राजी-नाराजीचे वातावरण तर आहेच, परंतु बहुतांशी इच्छुकांनी आता कितीवेळ थांबायचे? असा प्रश्न सुरू केल्याने या सर्वच आमदारांकडे स्पर्धा वाढली आहे. त्यातच पक्षाने आता जो दमदार तोच आमदार अशी भूमिका घेतल्याने विद्यमान आमदारांची चिंता वाढली आहे.लोकसभेतील कामांचे देखील मूल्यमापनलोकसभा निवडणुकीतदेखील भाजपने एका खासगी एजन्सी मार्फत पक्षाच्या उमेदवारासाठी कोणी काय काम केले, त्याचप्रमाणे बुथ उभारले होते किंवा नाही अशा प्रकारची तपासणी केली होती. पक्षातील निरीक्षकांना पाठविल्यानंतर डावे उजवे होऊ शकत असल्याने त्यांच्याऐवजी भाजप सातत्याने खासगी एजन्सीवरच भर देत आहे.एकदा नव्हे दोनदा सर्व्हेभाजपने एका एजन्सीमार्फत आमदारांच्या कामगिरीचा सर्व्हे केला असला तरी त्याएका सर्व्हेत दोष असतील तर पुन्हा अडचण येऊ नये यासाठी पक्षाने पुन्हा त्यावर आणखी एका त्रयस्थ एजन्सीमार्फत वॉच ठेवून सर्व्हे केला आहे. त्यामुळे हा सर्व्हे पक्का ठरला आहे.
ज्याची कामगिरी दमदार तोच होणार आमदार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:57 AM