नाशिक : तब्बल सात महिने आयुक्त नसल्याने महापालिका कासावीस झाली असून, लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणूक पार पडली आता तरी नवीन आयुक्त द्या, असा सूर आळवायला नगरसेवकांनी सुरुवात केली आहे. विशेषत: नगरसेवकांतून चार आमदार निवडले गेल्याने आता याच निर्वाचित उमेदवारांनी लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे.तब्बल सात महिन्यांपासून पालिकेला आयुक्त नाही. त्यामुळे नागरी कामांचा खोळंबा झाला आहे. कोट्यवधी रुपयांची नागरी कामे सोडाच; परंतु अत्यंत क्षुल्लक कामेही पूर्णवेळ आयुक्तांअभावी रखडली आहेत. तोंडावर कुंभमेळा असताना, महापालिकेला एक पूर्णवेळ आयुक्त नाही अशी स्थिती आजवर कधीही उद्भवली नव्हती. कॉँग्रेस आघाडी सरकार आणि त्यातही नगरविकास खाते ज्यांच्या अखत्यारित होते, त्या तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात दुर्लक्ष केल्याने पालिकेला सात महिने पूर्णवेळ आयुक्त नाही हा नवा विक्रम नोंदविला गेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहिता भंगामुळे पालिकेचे तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर आजवर चार ते पाच प्रभारी आयुक्त येऊन गेले; परंतु पूर्णवेळ आयुक्त मिळालेले नाहीत.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली, त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे निमित्त पुढे करण्यात आले; परंतु आता ही निवडणूकही संपली तरी पूर्णवेळ आयुक्तांची प्रतिक्षाच आहे. सध्या पालिकेच्या सभागृहात सदस्य असलेले चार नगरसेवक आता आमदार म्हणून विधिमंडळात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता शहरातील तीन निर्वाचित आमदारांनी आधी पूर्णवेळ आयुक्त आणावे, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)
आमदारांनी दाखवावा बाणा, पालिकेला आयुक्त आणा...
By admin | Published: October 31, 2014 12:10 AM