दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दाखल झालेल्या अर्जांची छाननी सोमवारी (दि.७) सुरू करण्यात आली. छाननी प्रक्रिया मंगळवार (दि.८) पर्यंत सुरू राहणार असून, त्यानंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, छाननीत काही अर्ज नामंजूर करण्यात आले असल्याचे समजते. त्यात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांच्यासह प्रवीण जाधव, भास्कर भगरे आदींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.निवडणूक निर्णय अधिकारी जी. जी. पुरी यांचे उपस्थितीत ९६ उमेदवारांच्या अर्जांची गटनिहाय छाननी प्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरू करण्यात आली. यावेळी ज्या उमेदवारांनी गेल्या पाच गळीत हंगामात किमान तीन वेळा ऊस पुरवठा केला त्यांचे अर्ज वैध ठरविण्यात आले, तर तीन वर्ष ऊस पुरवठा न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आला. काही उमेदवारांबाबत सहकारी संस्था थकबाकी बाबत आक्षेप घेण्यात आल्याने त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता असून, याबाबत मंगळवारी सकाळी अकरापर्यंत निर्णय होणार असल्याचे समजते. त्यानंतर वैध अर्ज उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, मागील पाच गळीत हंगामात तीन वर्षे ऊस पुरवठा न केलेल्या उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून, त्यात शिवसेना माजी जिप गटनेते प्रवीण जाधव, दिंडोरी खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन दिलीप जाधव, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ, जि.प. सदस्य तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, माजी संचालक विजय कोतवाल, शिवाजी जाधव, बबन पूरकर, शिवसेना नेते माजी पंचायत समिती सदस्य विलास निरगुडे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष श्याम हिरे, माजी चेअरमन बाजीराव कावळे यांचे नातू हर्षवर्धन कावळे आदींचे अर्ज बाद झाल्याचे समजते.दरम्यान, विरोधी पॅनलचे नेते प्रवीण जाधव यांनी सदर प्रक्रियेवर आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांचे दबावाने सरकारी यंत्रणेने अर्ज बाद केल्याचा आरोप करत न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले, तर सत्ताधारी गटाने आरोप फेटाळत सरकारी यंत्रणेने नियमानुसार प्रक्रिया राबविली असल्याचे सांगितले.आरोपांत तथ्य नाही : पुरीनिवडणूक निर्णय अधिकारी जी. जी. पुरी यांनीही सर्वप्रक्रिया नियमानुसार कायदेशीरपणे पार पाडली जात असून, कुणाच्या आरोपात तथ्य नाही. नामंजूर अर्ज झालेल्या उमेदवारांना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर यांच्याकडे अपील करता येणार असल्याचे सांगितले.