नाशिक-
भाजपासोबत गेलेले आमदार लवकरच शिवसेनेत परत येणार आहेत. आम्हीच खरी शिवसेना आहोत. सगळे गेलेले आमदार परत येतील. पण एकनाथ शिंदे येणार नाहीत. त्यांना आम्ही घेणारही नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
आम्हीच खरी शिवसेना असून सध्याच्या सरकारचं काही खरं नाही. कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. आज एकीकडे आंदोलनं सुरू आहेत पण दुसरीकडे सरकार वेगळ्याच कामात व्यस्त आहे. आता भाजपासोबत गेलेले आमदार खऱ्या शिवसेनेत परत येणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे परत येणार नाहीत. त्यांना आम्ही घेणारही नाही, असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेडमध्ये सभा झाली. त्यानंतर राज्यात इतर ठिकाणी देखील सभा घेण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे मालेगावमध्ये २६ तारखेला सभा होत असून उत्तर महाराष्ट्राची ही सभा होणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
"सध्याचे राजकारण लोकांना चांगलं कळालं आहे. लोक यांना वैतागले आहेत. सरकार ज्याप्रमाणे काम करत आहे ते पाहता लवकरच हे सरकार पडणार असून शिवसेनेतून बाहेर पडलेला गट पुन्हा शिवसेनेत येणार आहे. मात्र एकनाथ शिंदे वगळता सर्व शिवसेनेत येतील. आम्ही एकनाथ शिंदे यांना घेणारही नाही", असं संजय राऊत यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र लढणार जागा वाटपावरुन वाद होणार नाही याची खात्री मी देतो. महापालिका संदर्भात देखील चर्चा सुरु आहे, ज्या मोठ्या महापालिका आहेत, त्या ठिकाणी एकत्र लढण्याची इच्छा असल्याचेही ते म्हणाले.