नाशिक : महापालिकेतील उद्यान विभागातील कोटेशन घोटाळ्यासह अनेक तक्रारींमुळे निलंबित करण्यात आलेले उद्यान अधीक्षक गो. बा. पाटील यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल असून पोलिसांनी काही मुद्द्यांवर तीनदा स्मरणपत्र पाठवूनही मनपा प्रशासन उपआयुक्त कार्यालयाकडून माहिती देण्यास चालढकल केली जात आहे. त्यामुळे पाटील प्रकरणी मनपा प्रशासनाचीच भूमिका संशयास्पद वाटत असून कर्तव्यकठोर आयुक्तांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.महापालिकेतील उद्यान विभागातील कोटेशन घोटाळ्यासह अनेक तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाने उद्यान अधीक्षक गो. बा. पाटील यांच्यावर दि. २२ जानेवारी २०१६ रोजी निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर प्रशासनाने गो. बा. पाटील यांच्यावर काही आरोप निश्चित करत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद नोंदविली होती. पोलिसात फिर्याद नोंदवूनही पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नसल्याबद्दल पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात होता. दरम्यान, मागील महिन्यात सरकारवाडा पोलिसांनी महापालिकेतील तब्बल २१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबासाठी नोटिसा काढल्या होत्या. त्यानुसार, सरकारवाडा पोलिसांनी २१ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जाबजबाब नोंदविण्याचे काम पूर्ण केले आहे. या चौकशीतून काही पुराव्यादाखल दस्तावेजही सादर झाले आहेत. तत्पूर्वी, पोलिसांनी १९ मे २०१६ रोजी महापालिकेतील सहायक आयुक्त (प्रशासन) संतोष ठाकरे यांच्याकडे पाटील प्रकरणात १३ मुद्द्यांवर माहिती मागविणारे पहिले पत्र पाठविले. परंतु, त्याबाबत प्रशासनाकडून कसलेही उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे सरकारवाडा पोलिसांनी तीनदा स्मरणपत्रे पाठविली. अद्याप एकाही पत्राला ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. त्यामुळे चौकशीच्या टप्प्यावरच पाटील प्रकरण अडकले असून मनपाचा प्रशासन विभाग माहिती देण्यास चालढकल करत असल्याने पाटील यांचा बचाव नेमके कोण करत आहेत, याबाबत संशय निर्माण झाला आहे.
अधीक्षक पाटील प्रकरणी मनपाची भूमिका संशयास्पद
By admin | Published: June 15, 2016 10:33 PM