नाशिक : पक्षीय संघटनाची अवस्था फारशी चांगली नसताना तसेच पक्षाच्या बाजूने कोणतेही वारे वाहत नसतानादेखील मनसेचे काही पदाधिकारी त्यांच्या मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यासाठी आपापल्या परीने मोर्चेबांधणी करीत होते. मात्र, शुक्रवारी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची ‘कृष्णकुंज’वर झालेल्या बैठकीत यंदाची निवडणूक लढवायची की नाही त्यावरच खल होऊन ती बैठकदेखील निर्णयाविनाच पार पडल्याने नाशिकमधील मनसेच्या इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे.महाराष्टÑ नवनिर्माण सेनेला नाशिकने राज्यात सर्वप्रथम महापालिकेवर सत्ता दिली. तसेच नाशिक महानगरातून २००९ साली तब्बल तीन आमदार निवडून देण्याची किमया करून दाखवली. त्याच नाशिकमध्ये दशकभरानंतर आमदारकीची निवडणूक लढवायला फारसे कुणी उत्सुक नाहीत. त्यातच जे विद्यमान पदाधिकारी उत्सुकता दाखवून रिक्षांवर पक्षाचे झेंडे आणि आपल्यासह पक्ष नेतृत्वाचे फोटो फिरवत वातावरण निर्मिती करीत आहेत, अशा इच्छुकांच्या उत्साहावर पाणी फेरण्याचे काम पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून होत असल्याची चर्चा त्यानिमित्ताने नाशकात सुरू झाली आहे. नाशिक महानगरातील काही जागा आणि जिल्ह्णातील काही जागांवर पक्षीय उमेदवार उभा करण्यावरून पदाधिकारी प्रयत्नशील होते. मात्र, पक्षीय स्तरावरच निवडणूक लढवावी किंवा लढवू नये, याबाबत सुस्पष्टता नसल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.संभ्रमावस्था घातकविधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्यास दोन-चार दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना मनसेसारख्या पक्षाने अद्यापही ठाम निर्णय न घेणे अनाकलनीय आहे. शुक्रवारी कृष्णकुंजवर झालेल्या बैठकीमध्ये निवडणूक लढवायची की नाही? याबाबतच चर्चा झाली. ती चर्चादेखील निर्णयाप्रत पोहोचू न शकल्याने आचारसंहिता चार दिवसांवर आल्याने ही संभ्रमावस्था पक्षासाठी घातक असल्याची कुजबुजदेखील यानिमित्ताने सुरू झाली आहे.लोकसभेचा कित्ता गिरवणार का?लोकसभेला मनसेने राज्यात एकही उमेदवार उभा केला नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध सभांचा धडका उडवत मनसेने एकाकीपणे किल्ला लढवला होता. त्यावेळी राज ठाकरे यांची भाषणे गाजली, मात्र जनतेने भाजपलाच मतदान केल्याने मनसे फॅक्टरचा फायदा झाला नसल्याची चर्चा रंगली होती. त्यावेळी ठाकरे यांच्या भाषणांची चर्चा झाली; पण पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही कामच नव्हते. विधानसभेलादेखील तोच कित्ता गिरवण्यात येणार असेल तर इच्छुकांनी काय करायचे असा संंभ्रम त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
निवडणूक लढवण्याबाबतच पक्षीय संभ्रम असल्याने मनसे इच्छुक नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 1:11 AM