या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवीन आडगाव नाक्यावर गेल्या आठवड्यात संभाजीनगर मार्ग असा नामफलक लावण्यात आला होता; मात्र दोन दिवसांपूर्वी सदरचा फलक कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची तक्रार मनसेने केली असून, सदरचा फलक महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या सांगण्यावरून काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या फलक चोरीमुळे मनसे-भाजपात भविष्यात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली असून, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याची मागणी करणाऱ्या भाजपानेच संभाजीनगरचा फलक काढल्याचा आरोप मनसेने केला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करावे या कारणावरून सध्या राजकारण सुरू असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यात उडी घेऊन गेल्या आठवड्यात औरंगाबाद नाक्यावर संभाजीनगर मार्ग असा नाम फलक लावला होता. सदर नामफलक नाशिक महापालिकेत मंजुरीसाठी प्रस्तावित असतानाच अज्ञात व्यक्तीने नामफलक चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आहे. मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नामफलक चोरी झाला म्हणून थेट पंचवटी पोलीस ठाणे गाठून तक्रार अर्ज सादर केला आहे. नामफलक चोरी करणाऱ्या संशयितांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष अंकुश पवार, सभागृह नेता सलीम शेख, जिल्हाध्यक्ष दिलीप दतीर, मनोज घोडके, श्याम गोहाड, मुक्ता इंगळे, अभिजित गोसावी, संदेश जगताप आदी उपस्थित होते.