घोटी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना मंगळवारी इगतपुरी न्यायालयाने एका खटल्यात जामीन मंजुर केला. खटल्याच्या सुनावणीच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना न्यायालयाने जातीने हजर राहण्याचे समन्स बजावले होते. यामुळे मुंबई आणि नाशिक जिल्ह्यातील राजसमर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली. फटाक्यांच्या जल्लोषात त्यांचे समर्थकांनी स्वागत करून पुष्पगुच्छ देण्यासाठी रीघ लावली. दैनंदिन खटल्याच्या सुनावणीला आलेल्या पक्षकारांना खोळंबून राहावे लागले. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालय आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. २००८ मध्ये रेल्वेमध्ये परप्रांतीय उमेदवारांना प्राधान्य मिळाले असल्याने अनेक ठिकाणी मनसेने आंदोलन केले. त्यामुळे राज ठाकरे यांना मुंबईत अटक झाली होती. त्यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ इगतपुरी येथील एका परप्रांतीय हॉटलवर मनसे सैनिकांनी हल्ला केल्याची घटना झाली. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची न्या. के. आय. खान यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यातील सहा आरोपींची यापूर्वीच निर्दोष मुक्तता करण्यात आलेली असली तरी पक्षप्रमुख म्हणून राज ठाकरे यांचे नाव खटल्यात दाखल आहे. सुनावणी काळात त्यांनी न्यायालयात एकदाही उपस्थिती न दाखविल्याने अखेर इगतपुरी न्यायालयाने त्यांना मंगळवारी हजर राहण्याची अंतिम संधी दिली. त्यानुसार राज ठाकरे उपस्थित राहिले. अॅड. सयाजी नागरे, अॅड. सुशील गायकर,अॅड. शिरोडकर यांनी इगतपुरी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम यांच्या मार्गदर्शनाखाली राज ठाकरे यांचे वकीलपत्र घेऊन त्यांना जामीन देण्याची मागणी केली. न्यायालयाने जामिनाची मागणी मान्य केली. नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक, अॅड. राहुल ढिकले हे ठाकरे यांना जामीन राहिले. न्यायालयाला ह्या खटल्यात आवश्यक ते सर्व सहकार्य करणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ठाकरे यांच्यासोबत माजी आमदार बाळा नांदगावकर, भगीरथ मराडे, रामदास आडोळे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 2:11 PM