नाशिक- इंटरनेट आणि मोबाईलमध्ये हेरगिरी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा मोदी सरकारला खड्ड्यात घालणारा आहे. सार्वत्रिक निवडणुका जशा जशा जवळ येतील तसं हे सरकार अशा चुका करतील असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आताचे सरकार बेकार आहे असं ही ते म्हणाले. आज नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकारने लोकांचे मोबाईल इंटरनेट तपासले तर त्यात नरेंद्र मोदी यांना शिव्याच दिलेल्या दिसतील असं सांगितलं.
पाच राज्यात झालेल्या निवडणुकात लागलेले निकाल हे तेथील मुख्यमंत्र्याच्या कामगिरीपेक्षा नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील रोष आहे. महाराष्ट्रात भाजपा सेनेचे त्यापेक्षा वाईट हाल होतील असे सांगताना राज यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकीत काय भूमिका असेल ते त्याच वेळी जाहीर करू असे सांगून राजकीय भूमिकेविषयी सस्पेन्स कायम ठेवला. लोकसभा आणि विधान सभा निवडणूका एकत्रित घेण्याची शक्यता त्यांनी नाकारली भाजपा फावडं आणि टिकाव एकाच वेळी आपल्या पायावर मारून घेणार नाही असं त्यांनी खास शैलीत सांगितलं. अमितचं लग्न अगदी साध्या पद्धतीने, आपल्या हौसेसाठी सर्वांची ससेहोलपट नको, सर्वांना बोलावलं तर आकडा सहा लाखांच्या घरात जाईल असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.