मनसे प्रमुख राज ठाकरे यांची व्यंगचित्रे कायमच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरताना दिसतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांच्या हाताखाली राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकलेचे धडे गिरवले. परंतु आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान काढलेलं चित्र सर्वांच्याच पसंतीस उतरलं असून ते चर्चेचाही विषय ठरत आहे. अमित ठाकरे यांनीदेखील आपल्या कुटुंबाच्या कलेचा वारसा जपल्याचं दिसून येत आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान अमित ठाकरे यांनी समोर बसलेल्या एका पत्रकाराचं हुबेहुब चित्र रेखाटल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या या कलेचं सर्वांकडून कौतुक होताना दिसत आहे.
आगामी पुणे आणि नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मनसेनं दंड थोपाटल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, नाशिकमध्ये अमित ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मनसे नेते संदीप देशपांडे हे पत्रकारांशी संवाद साधत असताना अमित ठाकरे यांनी त्यांच्या समोर असलेले कागद आणि पेन हाती घेतलं. तसंच त्यांच्या समोर बसलेल्या एका पत्रकाराचे हुबेहुब चित्र रेखाटले. त्यांच्या या कलेचं सर्वांकडूनच कौतुक करण्यात आलं.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेली व्यंगचित्रेही अनेक स्तरांवर गाजली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील त्यांच्याकडून व्यंगचित्राचे धडे घेतले. त्यांचीच कलेची ही परंपरा अमित ठाकरे यांनीदेखील कायम ठेवल्याचं या निमित्तानं दिसून आलं आहे.