एका विवाह सोहळ्यासाठी राज ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ते पाथर्डी फाटा येथील एका तारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाला हाेते. त्याच ठिकाणी भाजपचे नाशिक शहर प्रभारी माजी मंत्री जयकुमार रावल देखील उपस्थित होते. सकाळी भाजपाच्या वतीने विकास कामांचे शुभारंभ असल्याने भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे त्यांना घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली अशी चर्चा पसरली. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुका होणार असल्याची चर्चा पसरली.
मनसे आणि भाजपाची जवळीक नवीन नाही. मनसेची नाशिकमध्ये सत्ता आली तेव्हा भाजपानेच टेकू दिला होता. त्यानंतर भाजपा शिवसेना एक झाल्यानंतर मनसेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची मदत घेतली हेाती. विधानसभा निवडणुकीत भाजपचे समीकरण कमालीचे बदलले असून भाजपाचा मित्र शिवसेना आता काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडीत आहेत. आणि भाजप हा त्यांचा एकमेव राजकीय शत्रू आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या दौऱ्यावर आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी भेट घेतल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी महापौरपदाच्या निवडणूकीत मनसेने भाजपाला साथ देण्याचा निर्णय घेतल्यांनतर शिवसेनेचा अवसानघात झाला होता. तर आत्ताही महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही मनसेने भाजपच्या बाजूने कल देत पाठराखण केल्याची बाब भाजपला दिलासादायक ठरली आहे. त्यामुळेच आगामी निवडणूकीसाठी ही राज भेट झाल्याची चर्चा झडली हेाती.
आजवर राज ठाकरे दौऱ्यावर आले असता भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरविण्याचीच भूमिका घेतली होती. परंतु अचानक आपल्या भूमिकेत भाजपने बदल केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोट...
माजी मंत्री जयकुमार रावल यांना महापालिकेच्या कामांच्या शुभारंभास नेण्यासाठी सकाळीच त्या हॉटेलमध्ये गेलो होतो. परंतु राज ठाकरे यांची भेट घेतली नाही.
- गिरीश पालवे, शहराध्यक्ष, भाजप