नाशिक : महापालिकेच्या सत्तेसाठी एकेक नगरसेवक महत्त्वाचा असताना दोन प्रभागात सध्या होत असलेल्या पोटनिवडणुकीतून पालिकेतील सत्ताधिकाऱ्यांनी माघार घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची ताकद टिकून राहावी, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तथापि, निवडणूक न लढविण्यामागे ‘कारण काय’ या प्रश्नामुळे मनसेचे कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले आहेत.सुमारे सव्वा दोन वर्षांपूर्वी मनपाच्या झालेल्या निवडणुकीत मनसेला सर्वाधिक चाळीस जागा मिळाल्या. त्यानंतर भाजपाने पाठिंबा दिला; परंतु तरीही बहुमताचा जादुई आकडा होत नसल्याने एकेक नगरसेवक मिळवताना मनसेला अनेक अडचणी उद्भवल्या होत्या. दरम्यान, प्रभाग क्रमांक ६१ मधील मनसेचे नगरसेवक हेमंत गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने या जागेवर, तर प्रभाग क्रमांक १७ चे कॉँग्रेस नगरसेवक दिनकर पाटील यांनीही राजीनामा देऊन बसपाकडून लोकसभा निवडणूक लढविताना राजीनामा दिला होता. त्यामुळे या दोन्ही जागांसाठी २९ जानेवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे. परंतु या दोन्ही निवडणुकीसाठी मनसेने उमेदवारच दिला नसल्याने कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. या दोन प्रभागात मनसेचे अस्तित्व नाही अशातला भाग नाही. प्रभाग ६१ मधून हेमंत गोडसे मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते. आता या ठिकाणी धनाजी कोठुळे तसेच कॉँग्रेसने उमेदवारी नाकारलेले पोपट हगवणे इच्छुक होते. इतकेच नव्हे तर हगवणे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता; परंतु ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल करू नका, असे सांगण्यात आले. प्रभाग १७ मध्ये यापूर्वी इंद्रभान सांगळे यांनी मनसेकडून उमेदवारी केली होती; परंतु निकालानंतर त्यांना विरोधकांकडून राजकीय त्रास झाल्याने त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यामुळे या जागेवरही उमेदवार उभा केला नाही. तथापि, तोंडावरच विधानसभा निवडणुका असल्यामुळे ताकद राखून ठेवणार असल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)