नाशिक (सुयोग जोशी) : मनसेच्या अठराव्या वर्धापनदिन सोहळ्यासाठी मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे गुरुवार (दि. ७) ते शनिवार (दि. ९) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजता ते प्रसिद्ध श्रीकाळाराम मंदिराला भेट देऊन रामाची महाआरती करतील. त्यानंतर दादासाहेब गायकवाड सभागृहात पक्षाला मार्गदर्शन करणार असून, लोकसभा निवडणूक प्रचाराचा शंखनाद करतील. त्यामुळे राज्याचे लक्ष नाशिककडे लागले आहे, अशी माहिती शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मनसेचे राजगड येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेत वर्धापन दिन सोहळा व तयारीची माहिती दिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर, सहकार सेना जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब निमसे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, योगेश लबडे, धीरज भोसले, नितीन माळी, योगेश दाभाडे ,गणेश कोठुळे, सुरेश घुगे, अनंत सांगळे, अमित गांगुर्डे, अक्षय खांडरे, मनवीसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, शहराध्यक्ष ललित वाघ उपस्थित होते. अधिवेशन तयारीबाबत गेल्या एक महिन्यापासून जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ नेते तयारी करत आहेत. शहरामध्ये अनेक ठिकाणी सजावटीचे काम केले जाणार आहे.असा असेल दौरा
राज ठाकरे यांचे दि. ७ मार्च रोजी सायंकाळी शहरात आगमन होणार आहे. पाथर्डी फाटा येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. दि. ८ रोजी सकाळी ९ वाजता श्रीकाळाराम मंदिरात महाआरती व दिवसभर प्रवेश सोहळे, इतर पक्षीय कार्यक्रम तसेच दि. ९ रोजी सकाळी ९ वाजेपासून दादासाहेब गायकवाड सभागृहात अधिवेशन होणार आहे.