जकारणात अचूक टायमिंगला मोठे महत्त्व असते. लोकांची मने पेटलेली असतात, तेव्हा तो विषय हाती घेऊन उभे राहिले तर त्यातून लोकमानसातील स्वीकारार्हता वाढीस हातभार लागून जातो. राज ठाकरे यांनी त्याचदृष्टीने मुंबईतील रेल्वे प्लॅटफार्मवरील चेंगराचेंगरीचा विषय उचलला. या निमित्ताने राज यांचा ‘फार्म’ परतून आल्याचे जे प्रत्यंतर आले ते पाहता त्यांच्या ‘मनसे’त आलेली मरगळ दूर होण्याची अपेक्षा उंचावली आहे.गेल्या विधानसभा व त्या पाठोपाठच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आलेल्या अपयशानंतर ‘मनसे’च काय, भाजपातर सारेच पक्ष जणू गारठून गेलेले आहेत. नाशकात तर महापालिकेत असलेली सत्ता गमवावी लागलीच; परंतु निवडणुकीच्या पूर्वीच एकेक मनसैनिक पक्ष सोडून चालते झाल्याने पक्ष-संघटनाही खिळखिळी झाली. राज ठाकरे यांचा ‘गड’ म्हणून लौकिक प्राप्त नाशकात ‘मनसे’ची झालेली ही वाताहत पाहता खुद्द राज यांनीही नाशकात काहीसे दुर्लक्षच केल्याचे दिसून आले. ‘एवढे सारे करूनही नाशिककरांनी हेच फळ दिले’ म्हणून त्यांनी आपली उद्विग्नता प्रदर्शिली होतीच. त्यामुळे नाशकातील पक्ष पदाधिकारीही तेव्हापासून निस्तेजावस्थेतच होते. पक्ष नेतेच काय, महापौरपदावरून उतरलेले अशोक मुतर्डक यांच्यासारखे नेतेही नावाला उरल्यासारखे होते. कारण, ना पक्षाचा काही कार्यक्रम हाती होता, ना पुढचे काही उद्दिष्ट्य डोळ्यासमोर. नेतेच गारठल्यामुळे कार्यकर्त्यांचे विचारू नका. ते बिचारे कोणता झेंडा हाती घेऊ आता, या चिंतेत राजकारणात स्वत:ची ‘स्पेस’ शोधण्यात लागले होते. अशात मुंबईतील एल्फिन्स्टन रोड रेल्वेस्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी होऊन अनेक निष्पापांचे बळी गेल्याची घटना घडली. हाच मुद्दा हाती घेऊन साध्या साध्या सोयी सुविधा सरकार देऊ शकत नसेल तर, असले सरकार काय कामाचे असा प्रश्न करीत राज ठाकरे यांनी संताप मोर्चा काढला. स्वाभाविकच या मोर्चाच्या निमित्ताने नाशिकच्या ‘मनसे’तही सळसळ घडून आली. मोर्चाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीतच त्याची चुणूक दिसून आली. इतक्या दिवसांपासून हबकलेल्या अवस्थेत असलेले नेते-कार्यकर्ते झाडून बैठकीला उपस्थित राहिलेले दिसून आले. पक्षाच्या चलतीच्या काळातही पक्षाशी फटकून वागलेले माजी आमदार नितीन भोसले यांच्यासारख्या काही नेत्यांचा यातील सहभाग लक्षवेधी ठरला. अपेक्षेप्रमाणे मुंबई मोर्चासाठी नाशकातून रसद पुरवठाही झाला. विशेषत: मोर्चापुढे बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत सरकारचा जो समाचार घेतला आणि जिकडे तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान सुरू असताना राज यांनी थेट मोदींवर निशाणा साधला, त्याने ‘मनसे’च्या शिडात चांगलीच हवा भरली गेली. नाशकात ‘मनसे’ची असलेली सत्ता हटवून महापालिकेत भाजपा वरचढ ठरली आहे. भाजपाच्या या सत्ताधाºयांना शिवसेनेसह अन्य सारे विरोधक वेळोवेळी अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत आहेतच. ‘मनसे’चे संख्याबळ तुलनेने खूपच मर्यादित असल्याने विरोधी पक्ष म्हणून ‘मनसे’चे अस्तित्व फारसे उठून दिसत नाही. परंतु आता राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केल्याने नाशकातील मनसैनिकांना महापालिकेतील भाजपाविरोधात सुस्पष्ट भूमिका घेऊन संधी मिळेल तेव्हा आडवे जाता येईल. त्यादृष्टीने महापालिका कामकाजाचा अनुभव असलेले ज्येष्ठ सदस्य मनसेकडे आहेत. तेव्हा मुंबईतील मुद्दा घेऊन मुंबईत ‘मनसे’चा मोर्चा निघाला असला तरी त्या निमित्ताने संघटनात्मक उत्साहाचे पडसाद नाशकातही दिसून येणे स्वाभाविक ठरले आहे.
‘मनसे’त सळसळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 12:49 AM