सिडको : महापालिकेच्या सिडको प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीचे वेध लागले असून, यंदाच्या वर्षी कोणत्या पक्षाचा सभापती होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक महापालिकेत मनसे, राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस आघाडी पुरस्कृत महापौर असल्याने हाच फॉर्म्युला प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत वापरण्याची शक्यता दिसून येत आहे. असे झाल्यास शिवसेनेचे अधिक नगरसेवक असतानाही त्यांचा सभापती होणे अवघड असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सध्या सिडको प्रभाग सभापतिपदी मनसेच्या नगरसेवक कांचन पाटील या आहेत. त्यांचा कार्यकाळ या महिनाअखेरपर्यंत आहे. यामुळे सिडको प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सिडको प्रभागात एकूण २२ नगरसेवक आहे. यात शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, उत्तम दोंदे, अॅड. अरविंद शेळके, डी. जी. सूर्यवंशी, कल्पना पांडे, हर्षा बडगुजर, वंदना बिरारी, शोभा निकम, शोभा फडोळ असे नऊ नगरसेवक आहेत. सेनेपाठोपाठ मनसेचे अनिल मटाले, सुदाम कोंबडे, शीतल भामरे, कांचन पाटील, सुवर्णा मटाले, रत्नमाला राणे असे सहा नगरसेवक आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शिवाजी चुंभळे, राजेंद्र महाले, कल्पना चुंभळे असे तीन तर कॉँग्रेसचे लक्ष्मण जायभावे, अश्विनी बोरस्ते मिळून दोन यांचा तर भाजपाकडून डॉ. अपूर्व हिरे, माकपाकडून अॅड. तानाजी जायभावे असे पक्षीय बलाबल आहे. मनसेचे नगरसेवक अॅड. अरविंद शेळके यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्याने सिडको प्रभागात शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक झाल्याने त्यांचे पक्षीय बलाबल वाढलेले आहे. निवडणुकीत सरळसरळ लढत झाल्यास संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेचा सभापती होऊ शकतो. परंतु नाशिक महापालिकेत मनसेचा महापौर हा मनसे, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस व अपक्ष आघाडीचा मिळून झाला असून, मागील वर्षी सिडको प्रभाग सभापतीच्या निवडणुकीतही अशीच आघाडी करण्यात आली होती. असाच फॉर्म्युला यंदाच्या प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत झाल्यास पुन्हा मनसे आघाडी पुरस्कृत सभापती होण्याची शक्यात दिसत आहे. (वार्ताहर)
मनसे आघाडी पुरस्कृत सभापतीची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2016 10:05 PM