नाशिकमध्ये स्मार्ट सिटीचा कारभार अत्यंत वादग्रस्त राहिला असून यापूर्वी महात्मा फुले कलादालन, नेहरू उद्यान, कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण, ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम, प्रोजेक्ट गोदासारख्या अनेक कामांत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्या आहेत. तब्बल दोन वर्षे रखडलेल्या अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका स्मार्टरोडचे काम व सद्यस्थितीत जुन्या नाशिकमधील बाजारपेठांलगत सुरू असलेल्या कामांमुळे नागरिक, व्यावसायिक, विद्यार्थी व महिला वर्गाला अनंत अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यात आता शहरातील विविध वाहतूक बेट पुनर्निर्माणाची भर पडत आहे.
सध्या पंचवटीतील परशरामपुरिया वाहतूक बेट, रविवार कारंजा येथे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनतर्फे ट्रायल रन सुरू आहे. अत्यंत योजनाशून्यरीत्या सुरू असलेल्या या ट्रायल रनमुळे येथील नागरिक व व्यावसायिक अत्यंत धास्तावलेले असून त्यांची स्थिती ‘भीक नको; पण कुत्रे आवर’ अशी झाली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांत सुरू असलेले ‘ट्रॅफिक ट्रायल रन’ त्वरित बंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, सत्यम खंडाळे, रामदास दातीर, नितीन साळवे, विक्रम कदम, योगेश लभडे, निखिल सरपोतदार, विजय ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.