नाशिक- राजकारणात मनसेचे सर्व बाजूंनी प्रयोग झाले परंतु उपयोग झाला नाही. मनसे आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष बनल्याची टीका राज्याचे अर्थ तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज नाशिक मध्ये केली आहे.
राज्यशासनाच्या वतीने वनीकरणासंदर्भात नाशिकच्या शासकिय विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपात कोअर टीम निर्णय घेत असते. त्यामुळे पक्षाने ठरवले तर मीही प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो असेही ते म्हणाले.नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी मनसचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. मनसे हा राजकारणात निवडून न येता केवळ टीका करणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका करण्यापेक्षा ते देशाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून बोलले असते तर अधिक योग्य ठरेल असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्य मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच म्हणजे अधिवेशनापुर्वी होईल परंतु राधाकृष्ण विखे पाटील मंत्री होण्याआधी त्यांचा भाजपात प्रवेश होईल असे सांगतानाच त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षाने जबाबदारी दिली तर ती स्विकारण्यास तयार असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणूकीतील पराभवामुळे कॉँग्रेस आणि राष्टÑवादी शक्तीहीन झाले आहेत. राष्टÑवादी हा पक्ष कॉँग्रेसमध्ये विलीन झालाच तर दोन्ही पक्षात केवळ स्पर्धाच वाढेल असेही ते म्हणाले.