नाशिक : राज्यात नाशिक महापालिकेत पहिल्यांदा सत्तारूढ होण्याचा मान मिळविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता येत्या निवडणुकीतही सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्न चालविले असून, त्याचाच एक भाग म्हणून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या स्वप्नातील काही प्रकल्पांचे लोकार्पण सोहळे कोणत्याही स्थितीत आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मार्गी लावण्याकरिता लगीनघाई सुरू झाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात सत्ताधारी मनसेने दाखविलेल्या स्वप्नांबाबत निराशाच पदरी आल्याने राज ठाकरे नाशिककरांच्या टीकेचा विषय बनले आहे. परंतु, राज ठाकरे यांनी काही प्रकल्प महापालिकेला आर्थिक झळ न लागू देता बड्या उद्योगांच्या सीएसआर उपक्रमांतून हाती घेतल्याने आणि त्यातील काही प्रकल्प दृश्य स्वरूपात दिसू लागल्याने त्याबाबत आकर्षणही निर्माण झाले आहे. राज ठाकरे यांनी टाटा ट्रस्टच्या सहयोगाने नेहरू वनोद्यानात बॉटनिकल गार्डन विकसित करण्याची संकल्पना मांडली आणि सदर प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रात्रंदिवस युद्धपातळीवर काम सुरू आहे. गंगापूररोडवरील इतिहास वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीचेही काम अंतिम टप्प्यात आहे, तर व्हिक्टोरिया पुलावर शिर्के उद्योग समूहामार्फत वॉटरफॉल आणि रामवाडीजवळील गोदापात्रात संगीत कारंजा उभारण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखालील जागांचे सुशोभिकरणाचे कामही एल अॅण्ड टी मार्फत सुरू आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा पुढील सप्ताहात करण्याचे नियोजन सुरू असून, सदर कामे पूर्णत्वासाठी लगीनघाई सुरू आहे. याशिवाय, मनसेत शिल्लक राहिलेल्या डझनभर नगरसेवकांच्या प्रभागातही विविध विकासकामांचे नारळ वाढविले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
‘राज’स्वप्नपूर्तीसाठी मनसेची लगीनघाई
By admin | Published: December 23, 2016 12:50 AM