संजय पाठक,
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील आणि राज्यातीला प्रदुषणाचा विषय पाडवा मेळाव्यात मांडल्यानंतर आता नाशिकच्या कार्यकर्त्यांनी गोदावरी प्रदुषणाचा मुद्दा हाती घेतला आहे. कोट्यवधी रूपये खर्च करूनही दक्षीण गंगा गेादावरी मैलीच असल्याने साधू महंतांना बरोबर घेऊन मनसेच्या वतीने बुधवारी (दि.९) रामकुंडात उतरून आंदोलन करण्यात येणार आहे.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील तसेच सलीम शेख आणि शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी यासंदर्भात आज पत्रकार परीषदेत माहिती दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रयाग राज येथील नदीचे पाणी दुषीत झाल्याचे सांगितल्यानंतर अनेकांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या मेळाव्यात देशातील आणि राज्यातील प्रदुषीत नद्यांची माहिती देतानाच पुरावे देखील दिले होते. अर्थात, राज ठाकरे यांनी दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या प्रदुषणाचा उल्लेख सभेत केला नसला तरी आता मात्र, नाशिकमध्ये याच विषयावरून आंदोलन करण्यात येणार आहे.
बुधवारी सकाळी १० वाजता मनसेचे पदाधिकारी आणि विविध आखाड्यांचे साधु महंत रामकुंडात उतरून महापालिकेला जाब विचारतील इतकेच नव्हे तर मध्यंतरी गोदावरी नदी अत्यंत शुध्द असल्याचा अहवाल देणाऱ्या प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका अधिकाऱ्यांना पाणी पिवून दाखवा असे आव्हान देणार आहेत.