नाशिक: काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट झाली होती. त्या भेटीनंतर मनसे-भाजप युती होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. पण, आता त्या चर्चांना पूर्णविराम लागलाय. नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
मनसे नेते अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे आज नाशिकच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. गेल्या पाच वर्षात नाशिककरांची पुरती निराशा झाली. पण, अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे नाशिकमध्ये कमबॅक करेल, असा विश्वास संदीप देशपांडेंनी बोलून दाखवला. तसेच, सध्या तरी आमच्याकडे कुणाकडूनही युतीचा प्रस्ताव आलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.
चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंची भेट
18 जुलै रोजी नाशिक महापालिका निवडणुकीच्या दौऱ्यासाठी आलेले राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील एकाच शासकीय विश्रामगृहावर उतरले होते. त्यावेळेस तया दोघांची भेट झाली. तेव्हापासून मनसे-भाजपा युती होईल, अशा चर्चा रंगू लागल्या. विशेषत: येऊ घातलेल्या मुंबई आणि नाशिक, पुणे महापालिकेत, अशा प्रकारची समीकरणे जुळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यावेळेस चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांचे नेतृत्व राज्याला हवे आहे, असे सांगताना त्यांचे कौतुक केले होते. मात्र, त्याचबरोबर ते परप्रांतीयांचा मुद्दा सोडत नाही, तोपर्यंत युती होऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले होते. पण, आज अखेर संदीप देशपांडे यांनी या युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.