’नाशिक : अडीच वर्षे संसार करणाऱ्या भाजपाने झटका दिल्यानंतर सत्ता टिकवण्यासाठी मनसेने राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसकडून मदत घेण्याची तयारी सुरू केली आहे. असे झाल्यास सारीच राजकीय समीकरणे बदलणार आहेत. विशेष म्हणजे, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने जाहीर केले नसले, तरी मनसेने मात्र सत्तेसाठी कोणत्याही पक्षाची मदत घेऊ, असे स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी कॉँग्रेस मनसेबरोबर सत्तेत सहभागी होण्यास उत्सुक आहे, परंतु राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा द्यावा असे मनसेच्या नेत्यांचे म्हणणे असल्याचे समजते. येत्या शुक्रवारी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी धक्कातंत्राचा वापर सुरू होऊ लागला आहे. महापौरपदाची निवडणूक घोषित झाल्यानंतर भाजपाने संदिग्ध भूमिका घेऊन मनसे आणि सेनेला झुलवत ठेवले होते; परंतु आज अखेरीस त्यांनी निर्णय जाहीर केला. तथापि, गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस यांच्यात सुरू झालेल्या चर्चेतच फारशी फलनिष्पत्ती होत नव्हती. सहल आणि अन्य खर्चावरून सुरू झालेल्या या वादात राष्ट्रवादीने वेगळी वाट धरली होती.