संजय पाठक, नाशिक: सध्या पावसामुळे नाशिक-मुंबई महामार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने या मार्गाची अवस्था ठिगळ लावलेल्या गोधडी सारखी झाली आहे. त्यामुळे नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच न्हाईच्या अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना चक्क गोधडी भेट दिली.
नाशिक- मुंबई महामार्गावर कसारा ते ठाणे दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम आणि त्यातच पडलेले खड्डे यामुळे नागरीकांची अवस्था बिकट झाली आहे. नाशिक ते मुंबई अंतर कापण्यासाठी पूर्वी तीन ते चार तास लागायचे आता सात ते आठ तास लागतात. विधी मंडळात याबाबत चर्चा हेाऊनही कोणतीच दखल घेतली गेलेली नाही.
अखेरमनसेच्या वतीने आज न्हाईच्या अधिकाऱ्यांना गोधडी भेट देण्यात आली. गोधडीला ज्या प्रमाणे ठिगळं लावण्यात आले, तशी या रस्त्याची अवस्था झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रस्त्याची अवस्था बिकट असताना टोल वसुली सुरूच असून ती तातडीने थांबवावी अशी मागणी यावेळी उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, महानगर संघटक विजय आहिरे, अमित गांगुर्डे, मिलींद कांबळे, निखिल सरपोतदार. नितीन धाना, रोहन जगताप, साहेबराव र्खजुल, बबलू ठाकूर यांनी केली आहे.