नाशिक : इगतपुरी तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांचा कारखान्यांमध्ये रोजगार मिळवण्याचा हक्क कोणीही डावलू शकत नाही. भाताला हमीभाव देण्यासाठी आगामी काळात नियोजन करण्यात येईल. धरणग्रस्त- प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. महाराष्ट्र बदलविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.इगतपुरी येथे शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करताना ते बोलत होते. राज यांनी सांगितले की, ह्या राज्यातील स्थानिक नागरिकांना इथल्या उद्योगधंद्यांमध्ये रोजगार मिळण्याचा हक्क आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांच्या भाताला हमीभाव मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. विस्थापित झालेल्या पीडितांना न्याय देण्यासाठी माहिती घेऊन काम करण्यात येईल. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही यावेळी अनेक मुद्द्यांवर टीकेची झोड उठवली.दरम्यान, राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी विविध गावांतील कार्यकर्ते, विविध संघटना, शेतकरी, विद्यार्थी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी औक्षण करून स्वागत केले. विविध संघटना आणि कार्यकर्त्यांनी त्यांना विविध प्रश्नांवर निवेदने दिली. यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार बाळा नांदगावकर, प्रदेश सरचिटणीस राहुल ढिकले, माजी महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, जिल्हा संघटक भगीरथ मराडे, तालुकाध्यक्ष मूलचंद भगत, रामदास आडोळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
भाताला हमीभाव देण्यासाठी मनसेचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 5:27 PM
राज ठाकरे : प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचे आश्वासन
ठळक मुद्देराज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही यावेळी अनेक मुद्द्यांवर टीकेची झोड उठवली.