नाशिक महापालिका निवडणुकीतील सणसणीत पराभवानंतर कोपगृहात जाऊन बसलेल्या राज ठाकरे यांनी अखेर ‘राजगडा’ला सावरायची सुरुवात केली असून, अलीकडच्या त्यांच्या नाशिक दौºयाकडे त्याचदृष्टीने पाहता यावे. मरगळलेल्या कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करण्याचे कसब राज यांच्या ठायी असल्याने या सावरासावरमधून पेटलेले कार्यकर्ते यापुढील काळात आक्रमकतेने विरोधकाची भूमिका बजावताना दिसून येण्याची शक्यता आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील मनसेच्या पराभवाने राज ठाकरे यांनी नाशिककडे काहीसे दुर्लक्षच केल्याचे दिसून येत होते. मध्यंतरी खासगी कार्यक्रमानिमित्त त्यांचे दौरे झालेही, परंतु पक्ष संघटनात्मक पातळीवर फारशी सळसळ दिसून येऊ शकली नव्हती. अलीकडेच झालेल्या दौºयात मात्र त्यांनी निस्तेज झालेल्या संघटनेला सावरण्याचा व आपल्या खास शैलीने ‘टॉनिक’ देण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला. जनतेची गाºहाणी मांडत व्यवस्थेच्या नावाने रडणारे कार्यकर्ते आपल्याला आवडत नाहीत, असे सांगत तक्रारी घेऊन येण्यापेक्षा तुमच्या तक्रारी माझ्यापर्यंत येतील असे काही करून दाखवा, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना चेतविण्याचा प्रयत्न केला. तसेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यशैली खळ्ळखट्याकची राहिली आहे. त्यामुळे आता मार खाणारे नव्हे, देणारे कार्यकर्ते हवेत; या राज ठाकरे यांच्या आवाहनानुसार यापुढील काळात काय पहावयास मिळते याची उत्सुकता लागून राहणे स्वाभाविक ठरले आहे. अर्थातच, येथे व्यवस्थेतील चालढकलच्या अनुषंगाने राज यांनी सदरचे आवाहन केले आहे. ते तसे लक्षात न घेता मनसैनिकांकडून उगाचच कोणालाही मार देण्याचे प्रकार घडून आले तर त्यातून नवीनच संकटाला सामोरे जाण्याची वेळ येईल हा भाग वेगळा. राजकारणात लाटा येत असतात. कधीकधी निराशाही पदरी येते. पण त्यामुळे हबकून न जाता नव्या दमाने उठून उभे राहायचे असते. राज यांनी तोच मंत्र आपल्या कार्यकर्त्यांना दिला. ज्या नाशिक महापालिकेत राज यांची सत्ता होती तेथे आता भाजपाचे कारभारी आहेत. केंद्र व राज्यातील भाजपाच्या सत्ता कारभाराचे वाभाडे काढीत ठाकरे यांनी थेट नरेंद्र मोदी यांनाही लक्ष केल्याचे दिसून आले आहे. मोदी भक्तांची संभावना ‘नमोरुग्ण’ म्हणून करत नाशिक महापालिकेतील कारभाराविरोधात मनसैनिकांना लढण्याचा व भोंगळ कारभारावर तुटून पडण्याचा आदेश ते देऊन गेल्याने यापुढील काळात स्थानिक भाजपा नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येऊ नये. दुसरे म्हणजे, भाजपात संधी असल्याचे पाहून महापालिका निवडणुकीत अनेकजण तिकडे चालते झाले होते. अशांपैकी जे पुन्हा मनसेत परत येऊ इच्छित आहेत त्यांना पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल, असे बजावले गेल्याने अडचणीच्या काळात पक्षात टिकून राहिलेल्यांचा हुरूप वाढण्यास मदत झाली आहे. राज यांच्या या दौºयात समृद्धीबाधितांनीही त्यांची भेट घेतली. या द्रुतगती मार्गामुळे जमिनी जाणाºया शेतकºयांना स्थानिक पातळीवर स्वत: संघटित होण्याचा सल्ला त्यांनी दिल्याने संबंधितांनी निराशेचा सूर आळवला, परंतु एकीकडे अन्य शेतकरी शासनाशी व्यवहार करीत असताना मोजक्या प्रमाणात राहिलेल्यांमध्ये एकजूट नसल्याने राज यांचा सल्ला गैर ठरविता येणारा नाही. या समृद्धीबाधितांचे नेतृत्त्व डाव्या चळवळीतील राजू देसले करीत आहेत. जिल्ह्यातील अन्य अनेक प्रश्नांसंदर्भात ते आपल्या पक्षाच्या वतीने नेहमी मोर्चेबाजी करीत असतात. परंतु ‘समृद्धी’प्रश्नी आपल्या पक्षाच्या मर्यादा लक्षात घेता ते शरद पवार, उद्धव ठाकरे ते राज ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांचे उंबरठे झिजवताना दिसून येतात. यात राज यांनी त्यांना स्पष्टपणे सुनावल्याचे दिसून आले. ते राज यांच्या स्वभावाला साजेसे होते. एकूणच राज यांनी पुन्हा नव्याने चालविलेली तयारी पाहता भाजपा विरोधकांमध्ये भर पडण्याचीच चिन्हे आहेत.
मनसेचे पुनश्च हरिओम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 1:58 AM
नाशिक महापालिका निवडणुकीतील सणसणीत पराभवानंतर कोपगृहात जाऊन बसलेल्या राज ठाकरे यांनी अखेर ‘राजगडा’ला सावरायची सुरुवात केली असून, अलीकडच्या त्यांच्या नाशिक दौºयाकडे त्याचदृष्टीने पाहता यावे. मरगळलेल्या कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करण्याचे कसब राज यांच्या ठायी असल्याने या सावरासावरमधून पेटलेले कार्यकर्ते यापुढील काळात आक्रमकतेने विरोधकाची भूमिका बजावताना दिसून येण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देपक्ष पातळीवर फारशी सळसळ नव्हतीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यशैली खळ्ळखट्याकचीभाजपा विरोधकांमध्ये भर पडण्याचीच चिन्हे