मालेगाव येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात शहरातील मौलाना-मौलवींच्या बैठकीत निलोत्पल बोलत होते. गेल्या आठवड्यात व्हॉटस्अॅपवर आक्षेपार्ह व्हीडीओ प्रसारित झाल्यानंतर जमावाने एका इसमाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत सदर इसम गंभीर जखमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरातील मौलानांची बैठक बोलवली होती. यावेळी निलोत्पल म्हणाले की, चुकीचे काम करणाऱ्या नागरिकांसाठी घटनेने कायदा बनविला आहे. कायद्यात शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था व शांतता टिकवून ठेवण्याचे काम पोलीसांचे आहे. जमावाकडून होत असलेल्या हिंसेची उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. कायदा हातात घेतल्याने अराजकता निर्माण होते. सोशल मीडियावर पोलीस विभागाकडून करडी नजर असल्याचे निलोत्पल यांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले म्हणाले की, भ्रमणध्वनी वापरणे जेवढे चांगले आहे तेवढे घातकपण आहे. सोशल मीडिया वापरणे म्हणजे दुधारी तलवारी सारखे आहे. तरुणांना व्यसनांपासून परावृत्त करावे असे आवाहन त्यांनी केले. बैठकीला पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, मौलाना अब्दुल कय्युम बारी, शहरातील मौलांना- मौलवी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
जमावाने कायदा हातात घेऊ नये : अपर पोलीस अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 5:36 PM