ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 29 - शेतक-यांच्या मजूर टंचाईचा लाभ उठवत मोहेगाव येथील एका शेतक-याला तुझ्या शेतात मजुरीचे काम करेल असे सांगून व दिशाभूल करून त्याची दुचाकी चोरणा-या ठगाचा मनमाड शहर पोलिसांना छडा लावण्यात यश मिळाले आहे. चोरी करण्याच्या आधी मोबाईलवर सहजगत्या झालेल्या फोटोसेशनमुळे पोलिसांना या आरोपीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. अशा प्रकारीच गेल्या काही महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने शेतकरी वर्गाने सतर्क राहाण्याची वेळ आली आहे.
अण्णा काकळीज हे शेतकरी नाशिक येथून मोहेगाव येथे जाण्यासाठी मनमाड येथे आले. रात्रीच्या वेळी चहा घेण्यासाठी पाकिजा कॉर्नरवरील चहाच्या टपरीवर गेले असता त्या ठिकाणी एक अनोळखी युवक भुकेने व्याकूळ झालो असून काहीतरी खाण्यासाठी द्या, अशी विनवणी करत होता. काकळीज यांना त्याची दया आल्याने त्यांनी चहा व बिस्किट त्याला दिले. दरम्यान चहाच्या टपरीवाल्याने सहजगत्या या युवकाचा काकाळीज यांच्या मोबाइलवर फोटो काढला.
त्यानंतर त्याने मला काहीतरी काम मिळून द्या. मी शेतीची सर्व कामे करू शकतो मला तुमच्या शेतावर कामासाठी घेउन चला,असा आग्रह धरला. काकाळीज यांनी नकार दिल्यानंतरही दुचाकी सुरू केल्यानंतर तो गाडीवर त्यांच्या मागे बसला. पवार वस्तीजवळ गाडी आल्यानंतर काकाळीज यांनी लघुशंकेसाठी गाडी उभी केली व ते रस्त्याच्या कडेला गेले. अंधारात त्या युवकाने मागून येऊन काकाळीज यांना मारहाण करून खिशातील पैसे व मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला.
बचावासाठी काकाळीज हे प्रतिकार करून लांब पळाले. त्याच दरम्यान त्याने दुचाकी घेऊन पळ काढला. काकळीज यांनी मनमाड येथे येऊन या बाबद पोलिसांना माहिती दिली. मनमाड पोलीस ठाण्याच्या पथकाने मोबाइलवरील आरोपीच्या फोटोवरून तपास कामाला सुरुवात केली. मालेगाव, धुळे,येवला, कोपरगाव येथे तपासाची चक्रे फिरवल्यानंतर सदर आरोपीचा कोपरगाव येथे तपास लागला. संशयित आरोपी नाना लोणारे (३०) याच्याकडून चोरून नेलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे.