ओझर : येथील एच.ए. एल या लढाऊ विमान कारखान्यामधील प्रतिबंधित क्षेत्रांची ट्रे गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय नामक दहशतवादी संघटनेला पुरवण्याच्या आरोपाखाली येथील कर्मचारी दीपक श्रावण शिरसाठ यास एटीएस ने अटक करून बेड्या ठोकल्या असल्या तरी दुसऱ्या दिवशी देखील त्याची कसून चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.भारतीय गुप्तहेर विभागाने महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला सदर माहिती दिली. यात शिरसाठ याला गुरु वारी(दि.८) ताब्यात घेण्यात आले. शुक्र वारी त्यास कोठडी झाल्यानंतर त्याची कसून चौकशी केली जात आहे. यात अजून कोणी सामील आहे काय, हे जाणण्यासाठी तपास पथकाने एचएएलला भेटी दिल्या आहे. कारखान्यात अँड्रॉइड मोबाईल वापरण्याला बंदी असताना देखील शनिवारी अनेक कर्मचाऱ्यांनी यास केराची टोपली दाखवली. ओझर परिसरात संरक्षण क्षेत्राशी निगिडत तीन समूह आहेत. यात एचएएल,त्याच्या शेजारीच वायुसेना केंद्र आहे तर काही कि.मी अंतरावर आंबेहिल परिसरात डीआरडीओ आहे. यात सुरक्षेच्या दृष्टीने बघितल्यास डीआरडीओ आणि वायुसेना केंद्र सर्वात संवेदनशील आहे. तीन महिन्यांपूर्वीच कंत्राटी कामावर आलेल्या एका कामगाराच्या मुलीचा आधारकार्ड बनावट निघाला होता. पहिल्याच गेटवर सदर प्रकरण उघडकीस आले होते. त्या ठेकेदारास तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली तर त्या चिमुकलीस बालसुधारगृहात पाठवण्यात आले. संरक्षण क्षेत्रासंबंधी संवेदनशील असलेल्या डीआरडीओत इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असताना एचएएल मध्ये इतकी शिथिलता का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कुणीही सहजपणे अँड्रॉइड मोबाईल आत मध्ये घेऊन जाऊ शकते. दीपक शिरसाठच्या प्रकरणानंतरही शनिवारी अनेक कर्मचारी सर्रासपणे मोबाईलसह प्रवेश करत असल्याचे दिसून आले.