नाशिक : प्रभाग क्रमांक २ मधील परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. आत्तापर्यंत अनेकांना चावा घेतल्यामुळे परिसरात या कुत्र्यांविषयी दहशतीचे वातावरण पसरले आहे. लहान मुले आणि वृद्धांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे प्रकार घडले आहे. या प्रकरणी पालिकेकडे तक्रार करूनही कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप येथील रहिवासी सचिन अहिरे यांनी केला आहे.सुमारे ३० जणांना चावा
प्रभागात आत्तापर्यंत मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी सुमारे तीस जणांना चावा घेतल्याचा दावा येथील नागरिकांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर करण्यात आला आहे. मनपाचे लक्ष नसल्याने आता नागरिक आंदोलनाच्या तयारी आहेत, असे मेसेजही व्हॉट्स अॅपवरही फिरत आहेत.आंदोलनाचा इशारा
प्रभाग २ मधील सरस्वतीनगर, अयोध्यानगरी, साईनगर, साईशिवनगर, महाजन उद्यान, तसेच सागर स्पंदन परिसरात कुत्र्याने चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रात्रीच्या सुमारास परिसरात पथदीप नसल्याने याच मार्गावर मोकाट कुत्र्यांनी अनेकांना लक्ष्य केले आहे. परिसरात घंटागाडी येत नसल्याने नागरिकांना नाइलाजास्तव कचरा रस्त्यावर टाकावा लागतो. या कचऱ्याभोवती जमा होणाऱ्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. काही दिवसांपूर्वी परिसरात एक चाळीस वर्षीय महिला आणि चार वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.