मालेगाव : वेळ सायंकाळी ५ वाजेची... अचानक शहरातील चर्चगेट भागाकडे पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवित धावत होत्या... त्यापाठोपाठ अग्निशमन दलाचा बंब यामुळे नागरिकांमध्ये काहीकाळ घबराटीचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिसांचे मॉकड्रील असल्याचे समजल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. येथील पोलीस नियंत्रण कक्षाने वरिष्ठ अधिकारी व पोलीस ठाणे, कर्मचाऱ्यांना शहरातील चर्चगेट भागात तरुणीची छेड काढल्यामुळे दोन गटात तुफान हाणामारी व दगडफेक सुरू असल्याचा संदेश दिला होता. हा संदेश मिळताच अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यापाठोपाठ अग्निशमन दलाचा बंबही घटनास्थळी दाखल झाला. अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक ओला यांनी मॉकड्रिल असल्याचे सांगितले. यानंतर अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक ओला यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्कालीन स्थितीत यंत्रणा तत्पर राहण्याबाबतच्या सूचना केल्या. यावेळी पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, अशोक नखाते, पोलीस निरीक्षक, इंद्रजित विश्वकर्मा, मसूद खान, राजेश शिरसाठ, अजय वसावे यांच्यासह पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव दलाची तुकडी घटनास्थळी उपस्थित होती. (प्रतिनिधी)
मालेगावी पोलिसांतर्फे मॉकड्रिल
By admin | Published: January 24, 2017 10:53 PM