नाशिक: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमामध्ये झालेल्या सुधारणेनुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या ८४ गट आणि पंचायत समितीच्या १६८ गणांची प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना गुरुवारी (दि.२) जिल्हा प्रशासनाने जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात ११ गट वाढल्याने गटांची संख्या आता ८४ इतकी झाली आहे. मालेगाव तालुक्यात दोन गट वाढले तर इतर नऊ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट वाढला आहे. येत्या ८ जून पर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहे.
२०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचा प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला असून त्या संदर्भातील अधिसूचना काढण्यात आली. त्यानुसार मालेगाव तालुक्यात एक गट वाढल्याने पर्ययाने दोन गण वाढले आहेत. तर बागलाण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नाशिक, त्र्यंबकेश्वर, कळवण आणि सिन्नर या ९ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट वाढला आहे.
निफाड तालुक्यात ओझर नगरपालिका झाल्याने तो गट कमी होऊन अन्य एक गट वाढला आहे. असे असले तरी या ठिकाणी पूर्वी १० गट होते त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. देवळा, नांदगाव, येवला व इगतपुरी या ४ तालुक्यांमधील गट, गणांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या प्रारूप रचनेवर ८ जून पर्यंत कार्यालयीन वेळेत हरकती आणि सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत विभागात हरकती आणि सूचना नोंदविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या सूचना वेळेत दाखल कराव्यात, ८ तारखेनंतरच्या कोणत्याही सूचना विचारात घेतल्या जाणार नसल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी स्वाती थवील यांनी सांगितले.
--इन्फो--
प्रभागांचा झाला विस्तार
जिल्हा परिषदेचे सध्या ७३ गट असून १४६ गण आहेत. नव्या प्रभाग रचनेनुसार ८३ गट झाले आहेत तर गणांची संख्या १६८ इतकी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबरोबरच पंचायत समितीची देखील निवडणूक घेतली जाते. महानगरपालिकेच्या रचनेप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या प्रारूप प्रभागांची रचना वाढली असून प्रभाग देखील वाढले आहेत.
--इन्फो--
असा आहे प्रभाग रचनेचा कार्यक्रम
८ जून पर्यंत : जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी
२२ जून पर्यंत : प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी होऊन अंतिम रचना करणे
२७ जून रोजी : जिल्हाधिकारी यांनी अंतिम प्रभागरचना राजपत्रात जाहीर करणे