मेशी : ग्रामीण भागातील असंख्य दैनंदिन वापराच्या वस्तू कालबाह्य झाल्या असून, त्यांची जागा आधुनिक साधनांनी घेतली आहे. त्याचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटेही जाणवतात.पूर्वी प्रत्येक खेड्यापाड्यात प्रत्येक घरात घट्या, वरवंटा असे घट्या म्हणजे, जातं म्हणून घट्या, वरवंटा गाढवावर ठेवून विकणारी माणसं खेड्याच्या गल्लीबोळात फिरत असत. काळानुसार त्या वस्तू कालबाह्य झाल्याने विक्रेत्यांचा गावागावांत घुमणारा आवाज आता क्षीण झाला आहे. त्याऐवजी आता मिक्सरने त्याची जागा घेतली आहे. मात्र यामुळे विशिष्ट कारागीरसुद्धा आता दिसत नाही. जे आहेत त्यांना आता दुसऱ्या व्यवसायाकडे वळावे लागले आहे. मात्र जुन्या कारागिरांना कामधंदा नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.मात्र आजी-आजोबा घरातील मंडळींना या वस्तूंची अधूनमधून आठवण करून देताना दिसतात. याशिवाय वस्तूंमुळे होणारा फायदा नव्या पिढीला समजावून सांगतात. आमच्या वेळेस वरवंट्यावर तयार केलेला मसाला अधिक चवदार असायचा असे ते आवर्जून सांगतात. पूर्वी मूग, उडीद, हरभरा यांची डाळ जात्यावर दळली जाई. आता खेड्यातही डाळ तयार करण्याची यंत्रसामग्री आली आहे. यामुळे वेळेची बचत होत असेल; परंतु तरीदेखील पूर्वीची जात्यावर दळलेली डाळ अधिक श्रेष्ठ दर्जाची कशी होती याबद्दल वडीलधारी मंडळी आवर्जून सांगतात.पूर्वीच्या घट्या, वरवंटा खडबडीत झाल्यास तो टकणारा कारागीरसुद्धा गावागावात खांद्यावर हातोडा, छन्नी घेऊन ‘घट्या टकवून घ्या हो’ अशा आवाजात फिरत असत. मात्र आता तो गल्लीबोळात घुमणारा आवाज बंद झाला आहे. काळाच्या ओघात अनेक बाबी, वस्तू कालबाह्य होत चालल्याने त्या केवळ आता जुन्या, वयस्कर वृद्धांकडूनच ऐकावयास मिळतात. (वार्ताहर)