नाशिक : घर बांधण्यावर लक्ष केंद्रित करताना त्यात राहणाऱ्या लोकांच्या गरजा पाहून ते ठरविले पाहिजे. गेल्या २५ वर्षांत बांधकाम क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. आजच्या बांधकामांद्वारे नैसर्गिक संसाधनांवर घाला घातला जात आहे. शहरांमध्ये प्रदूषण, सिमेंटचे जंगल, कचरा, कार्बनडाय आॅक्साईडचा मारा अशा आरोग्याला मारक गोष्टींचा सामना करावा लागतो आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभियंता पी. आर. स्वरूप यांनी केले. शुक्रवारी (दि. २७) हॉटेल ताज येथे सुरू झालेल्या ‘इन्फ्रा सीई २०१८’ या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. असोसिएशन आॅफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स, नाशिक सेंटर यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळी शहर, गावांची रचना सुटसुटीत व पर्यावरणपूरक होती. आताच्या शहर विकास धोरणात या गोष्टी अगदी उलट पहायला मिळतात. भविष्यकाळात बांधकाम क्षेत्रात शाश्वत शहरीकरण या प्रणालीचा पुरस्कार झालेला पहायला मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्थापत्यशास्त्र अभ्यासक सुलक्षणा महाजन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, शहरांची रचना ही त्यात राहणाºया लोकांना सुखसोयी देणारी, आरोग्याच्या दृष्टीने हितकारक, राहण्यासाठी मदत करणारी असली पाहिजे; पण दुर्दैवाने या साºया गोष्टी दूर सारत पर्यावरणाला आणि त्यायोगे मानवजातीला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या हानी पोहोचेल अशीच बांधकामे, शहरांची निर्मिती, विकास पहायला मिळतो आहे. भारतसह इतरही काही देशांमध्ये पर्यावरणाचे मोठे प्रश्न निर्माण झाले असून, शाश्वत शहरीकरण, पर्यावरणस्नेही पैलू यांचा अंतर्भाव करण्यावर आजच्या अभियंत्यांनी भर द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पुनीत रॉय यांनी प्रास्ताविक केले. हेमंत धात्रक यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पी. सूर्यप्रकाश, सन्ना रत्नवेल, सी. एच. प्रकाश, संतोष काठे, विजय सानप आदींसह देशभरातून तज्ज्ञ अभियंते, अभ्यासक उपस्थित होते. परिषदेचा समारोप शनिवारी (दि. २८) होणार असून, या अंतर्गत तज्ज्ञांची विविध सत्रे होणार आहेत.राजीव सेठी यांचे मार्गदर्शनटीइआरआय विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. राजीव सेठी यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जागतिक पातळीवर मोठ्या संख्येने लोकसंख्या वाढते आहे. घरे, इंधन, परिवहन अशा सगळ्याच गरजा वाढत चालल्या आहेत. त्याचबरोबर सामाजिक ताण, गुन्हे वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या गरजा कमी करण्याची वेळ आता आली आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आधुनिक अभियांत्रिकी नैसर्गिक संसाधनांना मारक : स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:43 AM