रामदास शिंदे,नाशिक : बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण मराठीत रूढ आहे. त्याचाच प्रत्यय देणाऱ्या एका रँचोने चक्क स्वस्तातली तीन चाकी तयार करून सरळ रस्त्यावर आणल्याने ही आधुनिक बाईक सर्वांचे आकर्षण ठरली आहे. व्यवसायाने शेतकरी असलेल्या राजेश विधाते यांचा मुलगा मयूर यास लहानपणापासून खेळण्यातील मोटार गाडयांचे प्रचंड आकर्षण. पुढे शेतीला जोड म्हणून वीटभट्टी व्यवसाय सुरू केल्याने व्यवसायाच्या निमित्ताने घरासमोर दुचाकी व चारचाकी ऊभ्या राहु लागल्या. मयूरच्या वाढत्या वयाबरोबर त्याचे मोटारीतले आकर्षणही वयपरत्वे वाढू लागले. सतत गाडयांशी खेळणाºया मयुरने दहावीनंतर नाशिकच्या मविप्र राजश्री शाहु महाराज तंत्रिनकेतन महाविद्यालयात प्रवेश घेतला. आणि त्याच्यातील सुप्त गुणांना अधिकच चालना मिळाली. सतत गाड्यांच्या इंजिनशी खेळणाºया मयुरने अखेरच्या वर्षात आपल्या महाविद्यालयीन प्रोजेक्ट करतांना काहीतरी हटके करण्याचा ध्यास घेतला. प्राचार्य बी.एन. राजोळे, विभागप्रमुख वाय.एम. हळदे यांच्या मार्गदर्शनाने सहकारी विद्यार्थी सार्थक बोरस्ते, ऋषीकेश निरगुडे, सार्थक पाटील यांना बरोबर घेऊन जुन्या दुचाकीच्या इंजिनचा वापर करून तीनचाकी तयार केली.टाकाऊ वस्तूंचा वापर करून अतिशय कमी खर्चात तयार केलेली तीनचाकी सहजपणे रस्त्यावरून फेरफटका मारू शकते. यासाठी मयुर आणी टीमला शिक्षक वाय.एम. हळदे, बी.एस. देशमुख, एन.ए. पवार, एम.एस. आवारे, श्रीमती एस.एस. गावले यांचेसह पालकांचे सहकार्य लाभले.-----------------शारीरिक अपंगत्व असलेल्या अनेक नागरिकांना दुचाकी चालवता येत नाही. अशा अपंग चालकांना विनासायास चालवता येईल अशा पध्दतीने ही तीनचाकी तयार करण्यात आली असून तासी ७० किमी वेगाने चालणारी ही भन्नाट गाडी सहजपणे जागीच वळण घेऊ शकते. शिवाय कोणत्याही परिस्थितीत पलटी होण्याचा धोका नसल्याने शारीरिक अपंगत्व असलेल्या नागरिकांना ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली तीनचाकी सर्वाधिक उपयुक्त ठरू शकेल असे मयुर विधाते याने सांगितले.-----------------महाविद्यालय स्तरावर ठरला यशस्वी प्रोजेक्टमयुर विधाते व सहकारी विद्यार्थी यांनी तयार केलेली ही मोटर साईड ड्रिफ्ट ट्राईक बाईक महाविद्यालयात झालेल्या स्पधेत प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली. तसेच नाशिक मोटार इनोव्हेशन फेस्ट या प्रदर्शनातही त्यांनी सहभाग नोंदवला. मयुरने यापुर्वीही जुन्या बुलेटला नवीन लुक देऊन आपल्या कलेने ती तयार केली होती. सद्या ही हटके गाडी रस्त्यावरून जातांना सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या प्रोजेक्टचे सर्वत्र कौतूक होत आहे.
नाशिकच्या रँचोंनी बनवली आधुनिक तीन चाकी बाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 1:36 PM