नाशिक : केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी, कामगार व व्यापारीविरोधातील निर्णयांविरुद्ध किसान बचाव आंदोलनाचा शुभारंभ महसूलमंत्री व प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत लासलगावी करण्यात आला. मोदी सरकार शेतकरीविरोधी सरकार असून, उत्तर प्रदेशातील घटना-घडामोडी पाहता देशवासीयांना आता जुलमी सत्तेविरुद्ध नव्या स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार असल्याचे थोरात म्हणाले. मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकारने बलात्कारप्रकरणी केलेली दडपशाही निंदणीय असून, योगी सरकार त्वरित बरखास्त करावे, असेही थोरात म्हणाले.
उद्योगपतींना फायदा व्हावा या हेतूने सर्वच देशात बाजार समिती व्यवस्था मोडीत काढली जात असल्याचा आरोपही थोरात यांनी केला.यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात एक कोटी शेतकरीवर्गाच्या सह्यांच्या निवेदनाचाही शुभारंभ करण्यात आला.नांदेडमध्ये बैलगाडी लाँगमार्चकेंद्र सरकारने शेतकरी विरोधीत तीन कायदे संसदेत मंजूर करून घेतल्याचे सांगत राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. नांदेडमध्ये पालकमंत्री अशोक चव्हाण, माजी खा़तुकाराम रेंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी लाँगमार्च काढण्यात आला़या आंदोलनात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते़ धनदांडग्यांचे हित पाहणारे मोदी सरकार चले जाव, असे सांगा, असे चव्हाण म्हणाले.रेंगे पाटलांची सोनसाखळी लांबविलीनांदेडमधील आंदोलनात परभणीचे माजी खा़ तुकाराम रेंगे पाटील यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची चैन चोरट्यांनी लांबविली़ चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी शोधाशोध केली परंतु चोरटा हाती लागला नाही.कोल्हापुरात ‘चले जाव - चले जाव, नरेंद्र मोदी, अमित शहा - चले जाव’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सांगलीत आंदोलनादरम्यान पेटलेला कामगार, शेतकरीच भाजपला हद्दपार करेल, असा विश्वास राज्यमंत्री विश्वजित कदम यानी बोलून दाखविला.