नाशिक : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आणखी एका विधानामुळे भाजपचे लक्ष्य बनले आहे. इगतपुरी येथे आयोजित मुंबई प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी ‘ज्याची बायको पळते त्याचे नाव मोदी ठरते’ असे विधान करून पुन्हा एकदा भाजपला अंगावर घेतले आहे. इगतपुरी येथे मुंबई प्रदेश काँग्रेसचे तीन दिवसांपासून प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. रविवारी (दि.२३) या शिबिराची सांगता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी मोदी व भाजप सरकारवर जाेरदार टीका केली. यावेळी पटोले यांनी बोलताना पुन्हा एकदा मोदी यांना लक्ष्य करीत त्यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले यांनी गावगुंडांना गावगुंडच दिसतील. त्यांची आता हलाखीची स्थिती निर्माण झाली असून, लोक भाजपवर हसू लागले आहेत. ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं. असे हे झाल्यावर आता काय बाकी राहिलं, असे सांगत त्यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. नाना पटोले यांनी मोदी यांच्यावर केलेल्या या टिपणीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले असून, भाजपने त्यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. काही दिवसांपूर्वीच पटोले यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना ‘मी मोदीला मारू शकतो, शिवीगाळही करू शकतो’ असे म्हणत भाजपचा राेष ओढवून घेतला होता. पटोले यांच्या विधानाचे पडसाद राज्यभर उमटून भाजपने ठिकठिकाणी तीव्र आंदोलन केले हाेते. आताही पटोले यांनी मोदी यांच्याबद्दल केलेल्या या विधानाला भाजपने आक्षेप घेतला असून, त्याचेही पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
इन्फो
बावनकुळेंना ओळखत नाही
पटोले यांनी चंद्रकांत पाटलांचाही समाचार घेतला.
केंद्रातील सरकारने किती मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले ती आकडेवारी त्यांनी जाहीर करावी. आधी केंद्रातील सरकार किती भ्रष्टाचारी आहे ते बघा, नंतर दुसऱ्याच्या घरावर गोटे मारताना आपले घर किती काचेचे आहे ते पाहावे, असा टोलाही पटोले यांनी लगावला. आपण बावनकुळेंना ओळखत नसल्याचेही ते म्हणाले.