नाशिक : लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे होणाऱ्या सभेसाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने सोमवारी जिल्हा प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. दिल्लीहून खास विमानाने ओझर येथे येणाºया पंतप्रधान मोदी यांना वाटेत शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून ओझर-पिंपळगाव हे अवघ्या पंधरा किलोमीटरचे अंतर ते हेलिकॉप्टरने कापणार आहेत. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या त्यांच्या प्राथमिक दौºयात तसा उल्लेख करण्यात आला आहे.शेतकºयांच्या प्रश्नांचा विचार करता, मोदी यांच्या सभेत गोंधळ होण्याची शक्यता गृहीत धरून त्या अनुषंगानेच उपाययोजना करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनावर आहे. कांदा व द्राक्ष उत्पादकाच्या भूमीत मोदी यांची सभा होत असल्यामुळे विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. सकाळी मोदी यांचे विमानाने ओझर येथे आगमन होईल व त्यानंतर ते हेलिकॉप्टरने पिंपळगावी दाखल होतील. ज्या ठिकाणी मोदी यांची सभा आहे, ती जागा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यात असून, सुमारे सहाशे एकर पडित जागेची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. सभेपूर्वी मैदानाची डागडुजी करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सोमवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.सभास्थळी येणाºया व्यक्तीची कसून तपासणी करण्याबरोबरच त्यांना कोणतेही साहित्य सभेच्या ठिकाणी नेता येणार नाही, अशा निष्कर्षाप्रत तयारी चालविली आहे. या बैठकीनंतर पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी पिंपळगावी जाऊन मोदी यांच्या सभेच्या ठिकाणाची पाहणी केली. हेलिकॉप्टरची सोय, कार्यकर्त्यांच्या पार्किंगची सोय, व्हीआयपींची व्यवस्था, डी झोन अशा विविध उपाययोजनांची माहिती जाणून घेतली.पिंपळगावची सभा आटोपल्यानंतर मोदी यांची नंदुरबारला सभा होणार असल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे सभा आटोपल्यावर मोदी पुन्हा हेलिकॉप्टरने ओझर येथे जातील व तेथून विमानाने धुळे व धुळ्याहून हेलिकॉप्टरने नंदुरबारकडे रवाना होतील, असा अंदाज बांधून त्यादृष्टीने सुरक्षेची व्यवस्था केली जात आहे.
सभेचे ठिकाण मोदी गाठणार हेलिकॉप्टरने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 1:34 AM