नाशिक : खादी ग्रामोद्योग केंद्राची दिनदर्शिका व डायरीच्या मुखपृष्ठावरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रसिद्ध केल्याप्रकरणी शहरातील गांधीप्रेमींनी एकत्र येऊन मोदी यांच्या विचारधारेचा मूक निषेध नोंदविला. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची दिनदर्शिका व डायरीवरील मोदी यांच्या छायाचित्र प्रसिद्धीचा वाद देशभर गाजत आहे. भारतीय चलनावरूनही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र आगामी काळात हटविण्यात येईल, असे वक्तव्य करणारे भाजपाचे हरियाणाचे आरोग्य राज्यमंत्री अनिल विज यांनी केल्यामुळे हा वाद आणखी पेटला आहे. देशभर मोदी व विज यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरही सध्या ‘भाजपा व मोदी यांची छबी ’ धोक्यात आली आहे. दरम्यान, शहरातील सर्व गांधीवादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह स्वातंत्र्यसैनिकांनी एकत्र येऊन भाजपा सरकार व मोदी यांचा मूक निषेध शिवाजीरोडवरील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर केला. यावेळी गांधीवादी व सर्वोदय परिवाराच्या वासंती सोर, स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर, अॅड. श्रीधर देशपांडे, डॉ. डी. एल. कराड, गौतम भटेवरा, डॉ. मिलिंद वाघ, श्यामला चव्हाण, हॉकर्स युनियनचे शांताराम चव्हाण, मनीषा देशपांडे, भारती जाधव आदि उपस्थित होते.
मोदींच्या ‘छबी’चा निषेध
By admin | Published: January 17, 2017 1:07 AM