नाशिक : महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी भाजपने लाखो रुपये खर्च केले असावे मात्र, त्यासाठी झेंडे बॅनरचा खर्च वगळता अवघे २२ हजार रुपये साधुग्रामच्या जागा वापराबद्दल मिळाले आहेत.महापालिकेच्या क्षेत्रातील भूखंड विविध खासगी कार्यक्रमांना विशेषत: राजकीय कार्यक्रमांसाठी देताना त्यासाठी भाडे आकारणी केली जाते. त्यासाठी विविध जागांसाठी प्रति चौरस फूट भाडे आकारण्याची तरतूद आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पंचवटीतील तपोवनात आयोजित करण्यात आल्यांनतर महापालिकेला मोठ्या प्रमाणात जागा भाडे मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात मात्र ही सभा खासगी जागेवर घेण्यात आली.सुमारे वीस एकर जागेवर वॉटर प्रुफ मंडप उभारण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेला कोणत्याही प्रकारचे उत्पन्न सभा स्थळापासून मिळाले नाही. केवळ वाहनतळासाठी जागा वापरण्यात आल्याने त्यासाठी २२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
मोदींच्या सभेतून मनपाला अवघे २२ हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 1:33 AM