दिंडोरी : कोरोनाचा आजार खेड्यापाड्यापर्यंत पोहोचत असल्यामुळे या आजाराचा आपल्या गावात शिरकाव होऊ न देण्यासाठी जानोरी, मोहाडी या गावांनी कंबर कसली असून, गाव संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय दोन्ही ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यानुसार गावातील सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय जानोरी -मोहाडी ग्रामपंचायतीने घेतला असून, नियम मोडणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी मोहाडी गावातील सर्व दुकाने, सेवा बंद करण्यात आल्या आहेत. एखादे दुकान किंवा सेवा सुरू दिसल्यास ११ हजार रुपये दंड आकारणी करण्यात येणार आहे. कोणीही व्यक्ती गावातील पार ओटे, सार्वजनिक जागा, चौक, मंदिरे, मस्जीद, धार्मिक स्थळे, गावातील रस्ते या ठिकाणी दिसल्यास त्याला ५०० रुपये दंड आकारणी करण्यात येणार आहे. मोहाडी गावाने गावातील ग्रामस्थांना बाहेर जाण्यास व इतरांना गावात येण्यास मज्जाव केला असून संपूर्ण गाव लॉकडाउन झाले आहे. त्याच अनुषंगाने जानोरी गावही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील सर्व दुकाने तीन दिवस बंद करण्याचा निर्णय जानोरी ग्रामपंचायतीने घेतला. यात वैद्यकीय सेवा वगळता गावातील भाजीपाला किराणा दुकान, भाजीपाला वगैरे सर्व सेवा बंद करून सर्वांनी घरातच थांबण्याचे आवाहन जानोरी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. या काळात कोणी ग्रामस्थ बाहेर फिरताना दिसल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे. लोकांच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेतला असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद माजी गटनेते प्रवीण नाना जाधव, मोहाडी सरपंच राजाराम जाधव, रत्ना क्षीरसागर, एस. एल. जगताप आदिंनी केले आहे.वैद्यकीय सेवा वगळता किराणा, भाजीपाला आदी सेवा तीन दिवसांसाठी संपूर्ण बंद करण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने असाच निर्णय गावाच्या हितासाठी घेण्यात येणार आहे. कोणत्याही ग्रामस्थांवर अन्याय किंवा त्याची गैरसोय होईल अशी भूमिका ग्रामपंचायतची नसून घेतलेला निर्णय हा सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या हितासाठी आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करून सहकार्य करणे अपेक्षित आहे. - गणेश तिडके, उपसरपंच, जानोरी
मोहाडी-जानोरीत दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 12:04 AM
कोरोनाचा आजार खेड्यापाड्यापर्यंत पोहोचत असल्यामुळे या आजाराचा आपल्या गावात शिरकाव होऊ न देण्यासाठी जानोरी, मोहाडी या गावांनी कंबर कसली असून, गाव संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय दोन्ही ग्रामपंचायतीने घेतला आहे.
ठळक मुद्देपूर्णत: लॉकडाउन : वैद्यकीय सेवा वगळता अन्य दुकाने बंद