नाशिक : पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ मोहरम महिन्यातील आशुराचा सण शुक्रवारी (दि.२०) शहर परिसरात पार पडला. तब्बल चार शतकांची परंपरा असलेल्या मानाच्या ताबुताचे दर्शन मुस्लीम धर्मीयांनी घेतले. त्यानिमित्त सुमारे दोनशे युवक मंडळांकडून सरबत वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याशिवाय मशिदीमध्ये दुवा- ए-आशुराचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
भद्रकाली हद्दीत इमाम शाही (सारडा सर्कल) व अंधेरी विहीर (सरस्वती लेन) या दोन ठिकाणी ताबुतांची स्थापना करण्यात आली होती. मात्र त्यांचे जागीच विसर्जन करण्यात आले. कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने मोहरमच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने घातली होती. यामुळे इमामशाहीतील मोहरमचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला होता. तरीदेखील सायंकाळी काही भाविकांनी मानाचा 'हालो का ताजिया' या ताबुताच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान मोहरमनिमित्त दिवसभर शहरातील विविध भागातील युवक मंडळांकडून दुधाचे सरबत वाटप करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत वाटप सुरू होते. दूध बाजार, मुलतानपुरा, जोगवाडा, काजीपुरा, बागवानपुरा, खडकाळी, कोकणीपुरा, चौक मंडई, वडाळा नाका, द्वारका, मनोहर मार्केट, बडी दर्गाह, नाईकवाडीपुरा, नानावली आदी भागातील शेकडो युवक मंडळांकडून थंड दुधाचे सरबत सर्व धर्मीयांना वाटप करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. अनेक घरांमध्ये गहू व डाळीपासून खिचडा तयार करून एकमेकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. दरम्यान इमामशाहीतील सय्यद कुटुंबीयांनी तयार केलेले ताबुताचे खांदेकरी म्हणून परिसरातील हिंदू महादेव कोळी समाजबांधवांना मान दिला गेला. इराक येथील करबला येथे मोहरमच्या दहा तारखेला पैगंबर यांचे नातू शहिदे आझम हजरत इमाम हुसैन शहीद झाले होते. तेव्हापासून आशुराचा सण साजरा करण्याची प्रथा आहे. आशुरानिमित्त गुरुवारी शहरातील बडी दर्गा परिसरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच विविध कब्रस्तानांमध्ये आप्तेष्टांच्या कबरीवर पुष्पांजली वाहण्यासाठीदेखील अनेक भाविक जमले होते.
इन्फो
गरजूंना अन्नधान्य वाटप
मोहरमच्या पूर्वसंध्येस हसनैन फाउंडेशनतर्फे शहरातील सुमारे तीनशे गरीब व गरजू कुटुंबीयांना गहू व तांदळाचे मोफत वाटप करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येकी पाच किलो गहू व तीन किलो तांदळाचा समावेश होता, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक शकील तांबोळी यांनी दिली.
इन्फो
मानाच्या ताबुताला खांदेकरी हिंदू
तब्बल ३० बांबूंचा वापर करीत ३३ लहान मोटे मनोरे आणि त्यावर २९ लाकडी कळस चढविण्यात आले. त्यावर सोनेरी रंगाच्या चमकणाऱ्या कागदाचे वेष्टण लावण्यात आले होते. ताबुताचा साचा तयार करून त्यावर रंगीत कापसाची सजावट करण्यात आली होती. त्यानंतर त्यावर अळीवाच्या बियांची आठवडाभरापूर्वीच पेरणी केल्याने उगवलेल्या रोपातून संपूर्ण ताबूत हिरवागार दिसत होता. या मानाच्या ताबुताचे कारागीर मुस्लीम आणि खांदेकरी हिंदू आदिवासी कोळी बांधव या परंपरेचे यंदादेखील पालन करण्यात आले.