▪️शेतकऱ्यांना दिलासा : पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
शेतकऱ्यांना दिलासा : पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने समाधानाचे वातावरण
देवगाव : गेले अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने गुरुवार आणि शुक्रवारी देवगाव परिसरातील काही गावांमध्ये तुरळक सरींसह हजेरी लावली. यामुळे भातपिकांना ओलावा मिळून नवसंजीवनी मिळणार असल्याने चिंतित असलेल्या बळीराजाला थोडासा दिलासा मिळाला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यासह दक्षिण भागातील शेतकरी बांधवांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्याने पेरणी केली होती. मात्र, काही रोपे माळरानावर असल्याने त्यांना नियमित पावसाची गरज असते. गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यातील देवगाव परिसरातील गावांमध्ये सर्वत्र कडक उन्हाने कहर केला होता, त्यामुळे उन्हामुळे पेरलेली रोपेही करपू लागली होती.
पंधरा दिवसांत पावसाचा एकही थेंब न पडल्याने लावलेली रोपे ओलाव्याअभावी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. मात्र, गुरुवारी आणि शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने देवगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे चित्र दिसत आहे. पावसाच्या सरींमुळे ही पिके आता पुन्हा तग धरतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. जर दोन-तीन दिवस पाऊस असाच कोसळत राहिला, तर उर्वरित शेतकऱ्यांची उरलेली कामे लवकर मार्गी लागतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
---------------------
गत दोन वर्षी अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर, त्या आधीच्या वर्षी अखेरच्या वेळी पाऊस न पडल्याने भातपीक करपून गेले होते, तर यावर्षी भात लागवडीसाठी रोपे तयार झाली असतानाही वेळेवरच पाऊस गायब झाल्याने मोठे संकट निर्माण होते. वेळेत भात लावणी न झाल्यास पिकावर परिणाम होतो. भाताची दिवस मर्यादा असल्याने काही भातपिके ९०, ११० हलवार तर काही १२०, १३५-४० गरवी पिके यामुळे जर अधिक कालावधी रोपट्यात गेल्यास त्याची उमेद तेथेच जाते. त्यामुळे शेतात लागवड केली तरी नंतर त्याची वाढ होत नाही. परिणामी दाणा पोसला जात नाही.
----------------------------
गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने भातपिके पिवळी पडून नष्ट होण्याच्या मार्गावर होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रुसलेल्या पावसाचे आगमन झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला. दोन दिवस पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याने भात पिकांमध्ये ओलावा निर्माण होऊन खरीप हंगाम वाया न जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
- अविनाश झोले, शेतकरी, टाकेदेवगाव. (१० देवगाव)
100721\10nsk_21_10072021_13.jpg
१० देवगाव