शैलेश कर्पे
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर: अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूतांपैकी एक मुहूर्त असून, या दिवशी कार्य करणे शुभ मानले जाते. खासकरून लग्न सोहळे याच दिवशी करण्याचा वधू-वर पित्यांचा मानस असतो. या दिवशी सगळीकडे लग्नाची धूम असते, पण कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही लग्न सोहळ्यांवर निर्बंध असल्याने आता पुढल्या वर्षी अक्षता टाकू, असे सांगत अनेक वधू-वर पित्यांनी लग्नसोहळे लॉकडाऊन केले असल्याने यावर्षी लग्नासाठी शुभ असलेला अक्षय तृतीयेचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे.
मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत आणि कोरोनाचा प्रादुर्भावही आहे. सिन्नर तालुक्यात दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण समोर येत आहेत, तसेच मृत्यूचा दरही वाढला आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरल्याने मे मध्ये होणारे हे लग्नसोहळे कोरोनाला निमंत्रण देणारे ठरणार असल्याने आपल्या कुटुंबाची व नातेवाइकांची काळजी घेत घरातील लग्नकार्ये अनेकांनी पुढे ढकलली आहेत. सध्याचे कमी उपस्थितीत व निर्बंध पाळून मोजक्या लोकांमध्ये झालेले लग्नसोहळे ही चांगली संकल्पना, पायंडा असल्याची भावना अनेकाने व्यक्त केली. मात्र, १२ मे पासून फक्त विवाह नोंदणी कार्यालयात ५ जणांच्या उपस्थितीत विवाह करण्यास परवानगी असल्याने यासाठी अनेकांनी नापसंती व्यक्त करून लग्न पुढे ढकलण्यावर भर दिला आहे.
यावर्षी लग्नाचे सर्वाधिक १४ मुहूर्त मे महिन्यात आहेत. चालू वर्षात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात लग्नमुहूर्त अतिशय अल्प होते. त्यामुळे अनेकांनी मे महिन्यातील मुहूर्ताला प्राधान्य देत विवाह निश्चित केले होते. २२ एप्रिलपासून लग्नाचे मुहूर्त सुरू झाले. तथापि, कडक निर्बंधही सुरू झाले होते. अगोदर ५० जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याला परवानगी होती. नंतर ती उपस्थिती २५ लोकांवर आली. आता तर कडक लॉकडाऊनमुळे ५ जणांच्या उपस्थितीत केवळ रजिस्टर विवाह करण्यास परवानगी आहे.
वैशाख व ज्येष्ठ हे महिने विवाह मुहूर्तासाठी सर्वोत्तम मानले जातात. त्यात ‘अक्षय तृतीये’च्या मुहूर्तावर व पंचागही पाहायची वेळ येत नाही. मात्र, आता कडक लॉकडाऊनमुळे अक्षय तृतीयेचा मुहूर्तही हुकला आहे. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला. ठरलेल्या मुहूर्तावर पाच जणांच्या उपस्थितीत रजिस्टर ऑफिसला जाऊन लग्न करायचे झाल्यास हौसेला मुरड घालून लग्न करण्यापेक्षा अनेकांनी लॉकडाऊन संपण्याची वाट पाहणे पसंत केले आहे.
इन्फो...
मंगल कार्यालयांचे गणित बिघडले
लग्न म्हटले की मंगल कार्यालय, आचारी, बॅँडबाजा, घोडा, वाहने आदींचे अगोदरच बुकिंग करावे लागते. लग्नपत्रिका, कपडेलत्ते, भांडीकुंडी, अहेर, फर्निचर, डागदागिने यांसह रुखवत आदी वस्तू लग्न मुहूर्तापूर्वी काही दिवस अगोदरच खरेदी कराव्या लागतात. मात्र, लॉकडाऊनमुळे आलेली बंधने, त्यात साधेपणाने उरकले जाणारे लग्नसोहळे यामुळे संबंधित व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून, त्यांची वार्षिक आर्थिक गणिते बिघडली आहेत.
इन्फो...
मे महिन्यात असलेले; परंतु लॉकडाऊनमुळे हुकलेले मुहूर्त
अक्षयतृतीयेसह ८, १३, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ तारखेला तर जून महिन्यात ८ मुहूर्त आहेत.
इन्फो...
विवाहसोहळे झाले लॉकडाऊन
सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी उन्हाळ्यात मे महिन्यात विवाह तारखा धरतात. मुलांना मे महिन्यात शाळेला सुटी असते व शेतकऱ्यांना मे महिन्यात शेतीची फारसी कामे नसतात. मात्र, यावर्षी मे महिन्यात कडक लॉकडाऊन लागल्याने विवाह सोहळ्यांवर बंधने आली आहेत. विवाह समारंभ धूमधडाक्यात करण्याकडे अनेकांचा कल असतो; परंतु लॉकडाऊनमुळे अनेक निर्बंध आल्याने अनेकांचा हिरमोड झाला असून, विवाहसोहळेच लॉकडाऊन झाले असे म्हणण्याची वेळ आली आहे.