लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनच्या पाठपुराव्यानंतर गत दीड वर्षांपासून सुरू असलेले ‘पॉपिंग सायकल ट्रॅक’चे काम आता अखेरच्या टप्प्यात आले आहे. केवळ ‘बोलार्ड’ बसविण्यासाठी अजून आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार असून त्यानंतर हा ट्रॅक सर्व सायकलप्रेमींसाठी खुला होणार आहे.
त्र्यंबक नाका ते शरणपूर पोलीस चौकीदरम्यान सुरू असलेल्या या कामाच्या सुशोभीकरणासाठी वृक्षलागवड तसेच सुशोभिकरणाच्या कामावरदेखील अखेरचा हात फिरवला जात आहे. आता केवळ या ट्रॅकच्या प्रारंभी केवळ सायकलीच आत येणे शक्य व्हावे तसेच अन्य वाहने आत घुसू नये म्हणून लावण्यात येणारे अडथळे
‘बोलार्ड’ बसविण्याचे काम बाकी असून ते काम आठवडाभरात पूर्ण होऊन हा सायकल ट्रॅक सायकलप्रेमींसाठी खुला केला जाणार आहे. नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या माध्यमातून गत दशकभरात चालविण्यात आलेल्या सायकल चळवळीमुळे जिल्हाभरात सायकलचा प्रसार खूप वेगाने होत आहे. संघटनेच्या सदस्यांची संख्यादेखील ३ हजारांनजीक पोहाेचली आहे. सायकल राईड्सच्या विविध प्रकारांमुळे पुरुष तसेच महिलांमध्येदेखील त्याची लोकप्रियता वाढली आहे. सायकल प्रसारासाठी प्रेरक उपक्रमांव्दारे नाशिक लवकरात लवकर सायकलची राजधानी म्हणून नावारूपास आणण्याचा संघटनेच्या स्थापनेचा निर्धारदेखील येत्या दशकभरात पूर्ततेकडे जाण्यासाठीच संघटना कार्यरत आहे. त्या पार्श्वभूमीवर या सायकल ट्रॅकने सायकलप्रेमींना कोणत्याही अडथळ्यांविना निर्धास्तपणे सायकल चालविण्याचा आनंद लुटता येणार आहे.
फोटो
०२सायकल ट्रॅक