निफाड : नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी पंतप्रधान कार्यालयाला मानिआॅर्डरने कांद्याच्या लिलावाचे पाठवलेले पैसे परत माघारी आले असून सदर मनीआॅर्डरवर रिफ्यूज असा शेरा मारण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयाने नाकारलेले पैसे सदर शेतक-याला नैताळे पोस्ट कार्यालयातून परत देण्यात आले. साठे यांनी पंतप्रधानांना मनीआॅर्डर पाठवून कांदा प्रश्नी शेतक-यांच्या व्यथांकडे लक्ष वेधले होते.दि. २९ नोव्हेंबर रोजी निफाडच्या उपबाजार आवारात नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. यावेळी कांद्याचा लिलाव होऊन अवघा १५१ रु पये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. अत्यंत अल्प भाव मिळाल्याने निराश झालेल्या साठे यांनी कांद्याच्या लिलावातून आलेली १०६४ रुपयांची रक्कम घेत थेट निफाडचे टपाल कार्यालय गाठले आणि कांदा लिलावातून आलेल्या १०६४ रुपयांची मनीआर्डर थेट पंतप्रधान कार्यालयाला केली. साठे यांच्या या कृतीची मोठीच चर्चा झाली. पंतप्रधान कार्यालयाकडूनही त्याची दखल घेण्यात आली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याबाबतचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत साठे यांची चौकशी होऊन सदर अहवाल रवानाही करण्यात आला. दरम्यान, सोमवारी (दि.१०) संजय साठे यांना नैताळे टपाल कार्यालयात बोलविण्यात आले आणि पंतप्रधान कार्यालयाकडून स्वीकारली न गेलेली १०६४ रुपयांची रक्कम परत करण्यात आली. पोस्ट मास्तर वासुदेव घोटेकर यांनी सदर पैसे साठे यांच्याकडे सुपुर्द केले. या मनिआॅर्डरवर रिफ्यूज असा शेरा असल्याचे नैताळे पोस्ट कार्यालयाने सांगितले.
नक्कीच मार्ग काढेल
कांद्याचे भाव कोसळल्याने शेतक-यांच्या व्यथा केंद्र सरकारला कळाव्यात म्हणून मी ही मनीआॅर्डर केली होती. मनीआॅर्डर केल्याने निदान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने या कांदा प्रश्नी दखल घेतली गेली. माझ्या सारख्या छोटया शेतक-याच्या या छोट्याशा प्रयत्नामुळे सरकारने दखल घेतली. सरकार कांद्याच्या प्रश्नावर नक्कीच मार्ग काढेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.- संजय साठे, शेतकरीफोटो- १० संजय साठे या नावाने आयएनटीपीएचला सेव्ह आहे.संजय साठे यांना मनीआॅर्डरचे पैसे परत करताना नैताळे पोस्ट कार्यालयाचे पोस्ट मास्तर वासुदेव घोटेकर.