नाशिक : नैर्ऋत्य मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सूनची प्रगती रखडली असून, पठारी प्रदेशासह बहुतांश भागात मान्सूनचे आगमन २२ जूनपर्यंत लांबणार आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिम नैर्ऋत्य भागात चक्रीवादळे तयार झाली आहे. या वादळांच्या प्रभावाने मान्सूनचे आगमन लांबणार असून, या काळात तपमानाचा ४० अंश सेल्सिअसपर्यंत लांबण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिम नैर्ऋत्य भागात म्हणजेच जपानच्या पूर्वेला व कॅनडाच्या पश्चिमेला आलेली वादळे ही या दशकातील सर्वात मोठी चक्रीवादळे ठरण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय उपखंडावरील सर्व बाष्प आणि ढग हे चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडे ओढले जात आहेत. त्यामुळेच विविध भागातून ताशी १५ ते २० किमी वेगाने वारे वाहत असून, सर्व बाष्पयुक्त ढग भूखंडावरून वाहून जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पठार व दख्खनचे पठार या पठारी भागात पावसाचा खंड पडणारआहे. जोपर्यंत प्रशांत महासागरातील वादळे शांत होत नाहीत तोपर्यंत पाऊस लांबण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्याला साधारणत: १० ते ११ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असून, १२ ते २२ जूनपर्यंत नाशिक जिल्हा व परिसरात पाऊस ओढ देणार आहे. ही परिस्थिती २३ जूननंतर बदलायला सुरु वात होईल व मान्सूनची प्रगती, प्रवास उत्तरेच्या दिशेने सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.चक्रीवादळांमुळे मान्सून लांबणार असल्याने २२ जूनपर्यंतच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यात तपमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी बागायती कापसाची लागवड केलेली असेल त्यांनी २ दिवसाआड सिंचन करणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे ज्यांनी कोरड लागवड अथवा धूळपेरणी केली आहे, ती वाया जाण्याची भीतीही असून, किमान पाऊस पडल्याशिवाय शेतकºयांनी पेरणी करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञ व जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
चक्रीवादळांमुळे मान्सून लांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 1:38 AM