नाशिक : गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या ३ टक्के चार कोटींचा अपंग निधी खर्च होत नसून, तो येत्या मार्चअखेर तो निधी खर्च करण्याचे प्रशासनाने नियोजन केले आहे. महिनाभरात कामकाज सुधारणा झाली नाही, तर पुन्हा येऊन बच्चू कडूस्टाईल आंदोलन करू, असा इशारा अपंगांसाठी कार्यरत प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेला दिला.दुपारी एक वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या कक्षात त्यांनी अपंगासाठी असलेल्या योजनांचा आढावा घेतला. समाजकल्याण विभागाचा सुमारे ४ कोटींचा चार वर्षापासून ३ टक्के अपंग निधी खर्च होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. हा निधी ७५ टक्के सामुहिक आणि २५ टक्के वैयक्तिक लाभावर खर्च करण्याचा शासन निर्णय चुकीचा असून, तो शासन स्तरावरून रदद करण्याबाबत आपण सरकारला विनंती करणार आहे. जेणेकरून सर्व निधी हा वैयक्तिक लाभावर खर्च करता येईल.
काही शिक्षकांनी बदल्या टाळण्यासाठी अपंग असल्याचे प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात सादर केले आहेत. या सर्व अपंग शिक्षकांच्या प्रमात्रपणांची पडताळणी करावी. ज्यात बोगस प्रमाणपत्र आढळतील, अशा शिक्षकांवर फौजदारी कारवाई करावी. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल. तसेच त्यांना प्रमाणपत्र देणाºया संबंधित वैद्यकीय अधिकाºयांवरही खटले दाखल करण्याची मागणी यावेळी आ. बच्चू कडू यांनी दीपककुमार मीणा यांच्याकडे केली. यावेळी प्रहार संघटनेचे दत्तू बोडके, महेश आव्हाड, दीपक भडांगे, अजित आव्हाड आदी उपस्थित होते.