इगतपुरी : ‘शरियत के लिये कुर्बान हो जायेंगे, कुरआन हमारी जान है’ अशा घोषणा देत सरकारविरोधात शहरातील शरियत बचाव तालुका कमिटीने अरब मस्जिद ते पोलीस ठाण्यापर्यंत मुस्लीम महिलांनी भव्य मोर्चा काढला. केंद्र शासनाने लोकसभेत तीन तलाक विधेयक मांडले, तसेच राज्य सभेतही ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे देशातील मुस्लीम समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. केंद्र शासनाच्या या धोरणाविरोधात इगतपुरी तालुका मुस्लीम महिला आणि शरियत बचाव कमिटीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी मूक मोर्चाद्वारे नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे व महिला पोलीस सहायक निरीक्षक रामेश्वरी पांढरे यांना मुस्लीम महिला कमिटीच्या प्रमुख व नगर परिषद बांधकाम विभागाच्या सभापती सीमा प्रल्हाद जाधव, रजिवाना खान, अफरीन सय्यद, जैनब शेख, निलोफर खान यांच्या हस्ते निवेदन दिले.भावना दुखावल्या जातीलप्रस्तुत बिल मंजूर झाल्यास शरियतचा अवमान होऊन धार्मिक भावना दुखावल्या जातील. भारतीय राज्य घटनेने देशात धर्म स्वातंत्र्य दिले असून, धर्म चालीरिती रिवाजाप्रमाणे वागणे, आचरण करण्याबाबत अधिकार असताना केंद्र शासन भारतीय राज्य घटनेचादेखील अवमान करीत आहे, असे मत नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे यांना दिलेल्या निवेदनात मांडण्यात आले.
इगतपुरीत मुस्लीम महिलांचा सरकारविरोधात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:32 AM