त्र्यंबकेश्वर : हरसूल येथे माकपतर्फे आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नायब तहसीलदार सतीश निकम यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.हरसूल येथील प्रादेशिक वन विभागाच्या कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. जीवनावश्यक वस्तूंची महागाई व पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करा, कोरोना बाधितांना मोफत उपचाराची सोय करा, मोफत लसीकरण करा, शेतकऱ्यांवर लादलेले अन्यायकारक कायदे रद्द करून शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्या, ताब्यात असलेल्या वन जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करा, कोविड काळात कामावर असलेल्या सर्वांना प्रोत्साहन भत्ता व ५० लाखांचा विमा उतरवा, आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार कामगारांना सरकारी नोकरीत कायम करा आदी मागण्या मांडण्यात आल्या.यावेळी जि.प. सदस्य रमेश बरफ, उपसभापती देवराम मौळे, पं.स. माजी सभापती ज्योती राऊत, लक्ष्मण कनोजे, पांडू दुमाडा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
हरसूलला आशा स्वयंसेविकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:53 PM