चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात द्राक्ष ,गव्हाचे उत्पादन अग्रेसर आहेच. त्याप्रमाणे हा परिसर उसासाठी देखील आता देशपातळीवर नावारूपाला येत आहे. येथील उसाच्या रसाची गोडी दिल्ली ,राजस्थान ,जम्मू काश्मीरच्या लोकांना लागली असून हंगामात दररोज १०० टनाहून अधिक ऊस राज्यासह परराज्यात पाठवला जातो.
निफाड तालुका हा नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादक म्हणून ओळखला जातो. तालुक्यात पर्जन्यमान चांगल्या प्रमाणात असते. त्याचप्रमाणे बारमाही वाहणाऱ्या नद्या व नांदूरमध्यमेश्वर धरण यामुळे नदी काठच्या गावांना पाण्याची व सिंचनाची वर्षभर सोय असते. मुबलक पाण्याची व मजुरांची उपलब्धता असल्याने अनेक शेतकरी आता पुन्हा ऊस लागवडीकडे वळू लागले आहे. पूर्वी तालुक्यात उसाचे उत्पादन सर्वाधिक होते, मात्र त्यानंतर शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकाकडे आपला मोर्चा वळवला मात्र अवकाळी पाऊस ,नैसर्गिक संकट यामुळे शेतकरी पुन्हा आता उसाच्या शेतीकडे वळू लागले आहे. गोदाकाठला सर्वाधिक ऊस उत्पादन होते. शेतकरी आपला ऊस स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून परराज्यात पाठवतात व त्यांना कारखान्यापेक्षा ३०० ते ५०० रुपयांपर्यंत अधिक भाव मिळतो. त्यामुळे हंगामात व आडसाली लागवड असलेला ऊस रसवंतीसाठी देतात.
अनेकांना मिळाला रोजगार
जानेवारी ते जून महिन्यात इंदोर ,जयपूर , सुरत, दिल्ली, भोपाळ ,रायपूर व जुलै ते ऑगस्ट दरम्यान राजस्थान ,पंजाब, हरियाणा ,दिल्ली , जम्मू काश्मीर येथील रसवंतीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून ऊस पाठवला जातो. गोदकाठचे ऊस उत्पादक शेतकरी ,ऊस तोडणीसाठी येणारे मजूर , ट्रक चालक ,टेम्पो चालक व व्यापारी यांना रोजगार उपलब्ध झाला आहे, तर हंगामात गोदाकाठला सुमारे १० ते २० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. हंगामात शेतकऱ्यांना साखर कारखान्यांपेक्षा ५०० ते ६०० रुपये जास्त मिळतात.
गोदाकाठला उच्च प्रतिच्या उसाचे उत्पादन घेतले व गोडवा अधिक असल्याने पराज्यात रसवंतीसाठी या भागातील उसाला मागणी अधिक आहे.
गणेश शिंदे, ऊस व्यापारी, चांदोरी