धनंजय रिसोडकर । नाशिक : जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यात एकही बळी गेलेला नव्हता. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या८ तारखेला मालेगावला पहिल्या मृत्यूची नोंद झाली. मात्र, एप्रिलमध्ये नाशिक महानगरात एकही मृत्यू झाला नव्हता. नाशिकचा पहिला कोरोना बळी मे महिन्यात ५ तारखेला गेल्यापासून मात्र जिल्ह्यातील बळींच्या आकड्यात भर पडू लागली. तरीदेखील २५ मेपर्यंत जिल्ह्यातील बळींची संख्या ५२वर होती. मात्र, त्यानंतरच्या गत महिनाभरात १५०हून बळींची नोंद झाली असून, जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या २१३वर पोहोचल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे.मे महिन्याच्या उत्तरार्धापासून जिल्ह्यातील मालेगाव आणि परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत असताना नाशिक महानगरातील आणि त्यातही जुने नाशिक, वडाळागाव, पेठरोड, पंचवटी परिसरातील बाधितांच्या आणि मृतांच्या आकड्यात प्रचंड मोठी भर पडल्याचे दिसून येतआहे.नाशिक जिल्ह्यात एप्रिलअखेरीस मृत्यूने दोन आकडी संख्या गाठली. त्यामुळे १ मेपर्यंत केवळ १२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच्या पंधरा दिवसांत २१ने वाढ होऊन मृतांचा आकडा ३३पर्यंत पोहोचला. त्यानंतर २५ मेपर्यंत बळींचा आकडा पन्नाशी ओलांडत ५२ वर पोहोचला.मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासूनच खऱ्या अर्थाने मृत्यूचे थैमान सुरू झाले असून, मे महिन्याच्या ३१ तारखेला हा आकडा थेट ७२वर पोहोचला. प्रामुख्याने नाशिक शहर आणि त्यातही जुने नाशिक आणि पंचवटी हे दाटीवाटीचे परिसर कोरोनाच्या केंद्रस्थानी आले आहेत.पहिले १०० बळी ६१ दिवसांत, पुढचे ११३ बळी १७ दिवसांतकोरोना बळी जाण्याचा जिल्ह्यातील प्रारंभ ८ एप्रिलला झाल्यानंतर पहिला १०० बळींचा टप्पा गाठण्यास तब्बल ९ जून उजाडला होता. म्हणजेच प्रारंभीचे १०० बळी होण्यासाठी दोन महिन्यांहून अधिक तब्बल ६१ दिवस लागले होते, तर त्यानंतरचे ११३ बळी १० जूनपासून २७ जूनपर्यंतच्या अवघ्या १७ दिवसांच्या कालावधीत गेले आहेत. प्रारंभीच्या १०० बळींच्या तुलनेत मृत्यूदर तिपटीहून अधिक असल्याने आरोग्य यंत्रणा कमालीची हादरून गेली आहे.नाशिक महानगरात सर्वाधिक मृत्यू : आतापर्यंत गेलेल्या बळींमध्ये नाशिक महानगरात ९१, मालेगावमध्ये ७३, ग्रामीण भागात ३८ जणांचा तर जिल्ह्याबाहेरील ११ व्यक्तींचा समावेश आहे, तर आतापर्यंत गेलेल्या २१३ बळींमध्ये ७६ महिला आणि १३७ पुरुषांचा समावेश आहे.
जिल्ह्यात महिनाभरात तब्बल १५०हून अधिक कोरोना बळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 1:44 AM
जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या २१३वर पोहोचल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धापासून जिल्ह्यातील मालेगाव आणि परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत असताना नाशिक महानगरातील आणि त्यातही जुने नाशिक, वडाळागाव, पेठरोड, पंचवटी परिसरातील बाधितांच्या आणि मृतांच्या आकड्यात प्रचंड मोठी भर पडल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देमृत्यूचे तांडव : २५ मेपर्यंत जिल्ह्यात ५२ मृत्यूची होती नोंद; नाशिक महानगराची वाटचाल शंभरीकडे; मृत्यूसंख्या २१३वर